पुणे : महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आरक्षित जागेचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामध्ये जागा जाणाऱ्या मालकांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. भूसंपादनासाठी ४० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

गेल्या आठवड्यात महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. या भागातील जागा ताब्यात घेऊन तेथे स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी आजूबाजूची जागा ताब्यात घेऊन आरक्षित केली जाणार आहे. राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली जाणार आहे. या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने या भागातील जागा ताब्यात घेत ही जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये एकूण ९१ मिळकती ताब्यात घेण्यात येणर असून, ५ हजार ३१० चौरस मीटर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. यामध्ये ५१६ मालकांची संख्या असून भाडेकरूंची संख्या २८५ इतकी आहे. यासाठी ४० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे. महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबााई फुले स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी येथील जागेचे भूसंपादन करून रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे. यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मान्य केला असून, प्रशासकीय मान्यतेनंतर हा मंजूर निधी महापालिकेला वितरीत केला जाणार आहे.