पुण्यातील कात्रज भाग तसेच समाविष्ट गावांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कात्रज पाणी पुरवठा केंद्रासमोर ही घटना घडली. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. “आंदोलक पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत होते. अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कात्रज गावठाण तसेच मांगडेवाडी, निंबाळकरवाडी या गावांचा महापालिकेत समावेश होऊनही पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. कात्रज चौकात कोंडी तसेच महापालिकेत समावेश होऊनही पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. याच्या निषेधार्थ कात्रज भागातील कार्यकर्ते नमेश बाबर यांनी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदनही देण्यात आले होते, अशी माहिती बाबर यांनी दिली.

“पोलिसांकडून लाठीमार करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न”

कात्रज पाणी पुरवठा पाणी केंद्रासमोर आंदोलन सुरू आहे. मंगळवारी (१९ एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलक महिलांवर लाठीमार केल्याचा आरोपही नमेश बाबर यांनी केला. तसेच आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, असा इशारा दिला.

“पालिकेकडून नागरिकांना कोणत्याही सुविधा नाही”

नमेश बाबर म्हणाले, “कात्रज गावठाण आणि त्या लगत असलेली गावे पुणे महापालिकेत समाविष्ट होऊन बरेच वर्ष झाले आहेत, पण तेथील नागरिकांना कोणत्याही प्रकाराच्या सुविधा पुरविण्यात पुणे महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. वेळेवर पाणी, कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासह अनेक प्रश्नाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले.”

“२ दिवसांपासून कात्रज चौकात आंदोलन, कोणतीही दखल नाही”

“या निवेदनाची दखल आजवर घेतली गेली नाही. त्यात आता महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने कामच होत नाही. त्यामुळे अखेर आम्ही मागील २ दिवसांपासून कात्रज चौकात आंदोलन सुरू केले आहे. त्याच दरम्यान आज पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशन येथे आंदोलन करीत होतो, पण तेवढ्यात पोलिसांकडून आमच्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये महिलावर देखील लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. आमचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत असेच आंदोलन सुरू राहणार आहे,” असा इशारा नमेश बाबर यांनी यावेळी दिला.

“आंदोलक पाणी पुरवठा केंद्रात शिरून तोडफोड करण्याच्या प्रयत्नात”

या घटनेवर परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त सागर पाटील म्हणाले, ” कात्रज पाणी पुरवठा केंद्रात आंदोलकांनी शिरण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा केंद्रात मोठे पंप तसेच इलेक्ट्रिक यंत्रणा आहे. आंदोलक पाणी पुरवठा केंद्रात शिरून तोडफोड करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी बंदोबस्तास असणाऱ्या वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा : बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावलं, पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

“आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यंत्रणेची तोडफोड झाली असती, तर पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता होती. तसेच दुर्घटना घडली असती. आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला,” असंही पोलीस उपायुक्तांनी नमूद केलं.