पुणे : सासवड रस्त्यावरील दिवे घाटात रविवारी वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन घडले. रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाने धडक लागल्याने जखमी होऊन रस्त्यात पडलेल्या बिबट्याला पाहून अनेक दुचाकी चालक घाबरले होते. वन विभाच्च्या रेस्क्यू टीमने दिवे घाटात धाव घेतली. तोपर्यंत बिबट्या हा घनदाट झाडीत निघून गेला. जखमी बिबट्याचा शोध वनविभागाकडून ड्रोन कॅमेराद्वारे उशिरा पर्यंत घेण्यात आला. मात्र, बिबट्या सापडला नाही.

वडकीकडून सासवडकडे जाताना दिवे घाटातील विठ्ठल मूर्तीच्या अलीकडे दुसऱ्या वळणावरती रस्त्याच्या मध्यभागी बिबट्या बसलेला होता. त्याच्या पायाला लागल्यामुळे तो काही काळ उठू शकला नाही. थोड्या वेळाने तो उठून उभा राहिला. मात्र, पायाला जखम असल्याने तो धावू शकत नव्हता. रस्त्यावरती काही काळ बिबट्या इकडून तिकडे तो चालत होता. नागरिकांच्या अवघ्या पंधरा-वीस फुटांवरती तो उभा होता. नागरिकांनी बिबट्याचे चित्रीकरण केले. दरम्यान दोन्हीकडची वाहतूक थांबल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा >>> मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे

काही वेळानंतर बिबट्या घाटातील घनदाट झाडीत गेल्यावर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळ आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. रस्त्यावर बिबट्याचे रक्त पडलेले दिसून आले. परिसरात शोध मोहीम सुरू केली. झाडी असल्याने ड्रोन कॅमेराद्वारे उशिरा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवे घाटात बिबट्या जखमी झाल्याची माहिती मिळताच, रेस्क्यू टीमसह आम्ही घटनास्थळी पोहचलो, मात्र, घाटातील विठ्ठल मूर्तीच्या अलीकडे दुसऱ्या वळणावरती रस्त्यावर रक्ताचे ठसे दिसून आले. त्यावरून त्याच्या पायाला मार लागला असावा. ड्रोनच्या साहायाने शोध मोहीम चालू केली आहे. जखमी बिबट्या मिळाल्यास त्याच्यावर उपचार करण्यात येतील. – मंगेश सपकाळ, वन परिमंडळ अधिकारी