पुणे : यंदा लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासह अचानक मतदान केंद्रावर गर्दी वाढल्यास ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी देखील वेब कास्टिंगचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सुमारे ४६ हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर चित्रीकरण केले जाणार आहे.
हेही वाचा >>> पुण्यात ११ अब्ज डॉलरचा ‘सेमीकंडक्टर’ प्रकल्प! केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
याबाबत बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मावळते मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘आतापर्यंत केवळ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जात होते. मात्र, यंदा एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. मतदानापूर्वी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून घरोघरी वोटर स्लिपचे वाटप करण्यात येते. या प्रक्रियेत मयत झालेले किंवा पत्त्यावर राहत नसलेले मतदार निदर्शनास येतात. त्यामुळे अशा घरांमध्ये स्लिपचे वाटप केले जात नाही. अशा मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येते. असे मतदार ज्या ठिकाणी जास्त असतील, त्या मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पाचपेक्षा जास्त खोल्या असणारी मतदान केंद्रे, गेल्या काही सार्वत्रिक लोकसभा, विधानसभा निवडणुकांत रांगा लागणारी मतदान केंद्रे किंवा सायंकाळनंतर मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागणारी मतदान केंद्रांवर देखील वेबकास्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे लाइव्ह चित्रीकरण पाहण्याची सुविधा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त, महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी यांना असणार आहे.’