पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे आणि नागपूर विभागातील पदवीधर तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठीची मतदार यादी तयार करण्यासाठी येत्या ३० सप्टेंबर रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून नाव नोंदविण्यासाठी नमुना १८ किंवा १९ द्वारे दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी ६ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रारूप याद्यांची हस्तलिखिते २० नोव्हेंबर पर्यंत करण्यात येणार असून प्रारूप मतदार याद्या २५ नोव्हेंबर रोजी जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

दरम्यान, दावे आणि हरकती २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत स्वीकारल्या जणार आहेत. या हरकती २५ नोव्हेंबर रोजी निकाली काढण्यात येणार असून त्यानंतर पुरवणी यादी केली जाईल आणि अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.या कार्यक्रमानुसार संबंधित मतदारांनी वेळेत आवश्यक दावे सादर करून नाव नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठीची मतदार यादी तयार करण्याचे काम निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात आले आहे. त्यातच आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार असल्याचे या निवडणुका एकाच वर्षात होणार आहेत.