पुणे : राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या सुटत नसल्याने त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयननी केली होती. याला काही स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, या मागणीला आता स्थानिक ग्रामपंचायतींनी विरोध केला आहे. याचबरोबर आयटी पार्कसाठी स्वतंत्र नगरपालिकेची मागणी त्यांनी केली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे यांसह अनेक समस्या आहेत. आयटी पार्कची जबाबदारी विविध शासकीय यंत्रणांमध्ये विभागलेली आहे. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पिंपरी-चिंचवड महापालिका, स्थानिक ग्रामपंचायती अशा विविध शासकीय यंत्रणांचा समावेश आहे. या यंत्रणांमध्ये योग्य समन्वय नसल्याने आयटी पार्कमधील नागरी समस्या सुटण्याऐवजी त्यात भर पडते. यंदा पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांवर पाणी साचून त्याचे रूपांतर ‘वॉटर पार्क’मध्ये झाले. त्यामुळे आयटी पार्कचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयननी केली होती.
या मागणीला आयटी पार्कमधील हिंजवडी, माण या स्थानिक ग्रामपंचायतींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आयटी पार्कमधील समस्यांचा मुद्दा भरकटविला जात असल्याचा दावाही ग्रामपंचायतींनी केला आहे. आयटी पार्क परिसरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा असल्याची त्यांची भूमिका आहे. याचबरोबर आयटी पार्कमधील एमआयडीसीच्या हद्दीत नागरी सुविधांची समस्या गंभीर असून, ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्त्यांसह इतर सुविधा चांगल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
मोहिमेत २५ हजारांहून अधिक जणांचा सहभाग
आयटी पार्कमध्ये सुमारे पाच लाख आयटी कर्मचारी काम करतात. आयटी पार्कमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र संघटनेने केली असून, यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत २५ हजारांहून अधिक आयटीयन मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होत असून, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची स्थिती सध्या काय आहे, हे आधी पाहावे आणि त्यानंतर ही मागणी करावी. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. ग्रामपंचायतीने याबाबत गेल्या वर्षी ठरावही केला होता. आयटी पार्क परिसरासाठी स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी आमची मागणी आहे. – अर्चना आढाव, सरपंच, माण
आयटी पार्कचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्यास आमचा विरोध आहे. त्याऐवजी आयटी पार्क परिसरातील पाच गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. तरीही आम्ही पुढील आठवड्यात ग्रामसभा घेऊन त्यात याबाबतचा ठराव मांडणार आहे. त्या वेळी लोक जो कौल देतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. – गणेश जांभूळकर, सरपंच, हिंजवडी