लोकसभा निवडणुकांसाठीच्या राज्यातील दुसऱया टप्प्यातील १९ मतदारसंघातील मतदानाला गुरूवारी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, मतदार यादीतील घोळामुळे पुणे शहरात अनेक मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित रहावे लागले. पुण्यातील अनेक मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असूनसुद्धा त्यांना मतदार यादीतील घोळामुळे मतदान करता आले नाही. मतदानाची वेळ संपेपर्यंत वाट पाहूनसुद्धा या मतदारांना मतदान न करता आल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. मतदान संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कामकाजाचे केंद्र असलेल्या कौन्सिल हॉल या दोन्ही ठिकाणी मतदान न करता आल्यामुळे शेकडो मतदारांनी कार्यालयांना घेराव घातला. यावेळी आपल्याला मतदान करू द्यावे, अशी मागणी या मतदारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणाला बसणार असल्याची माहिती पुण्यातील भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी मतदार यादीतील घोळामुळे मतदान न करता आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची कौन्सिल हॉलबाहेर गर्दी झाली होती. या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर ‘अब की बार, मोदी सरकार’च्या घोषणा.’ दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2014 रोजी प्रकाशित
पुण्यात संतप्त मतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव
मतदार यादीतील घोळामुळे पुणे शहरात अनेक मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित रहावे लागले.
First published on: 17-04-2014 at 08:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2014 large turnout of voters in pune