मुंबई उपनगरीय रेल्वेच्या धर्तीवर प्रवाशांकडून मागणीला जोर

पुणे : करोना काळामुळे सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेली पुणे-लोणावळ उपनगरीय रेल्वे सेवा पुन्हा कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे. लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून मुंबईत उपनगरीय रेल्वेतून प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील सेवाही पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला जोर आला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये संसर्ग वाढीस लागल्यानंतर तातडीने पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा बंद करण्यात आली होती. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर केवळ २० टक्के फेऱ्या सुरू करून त्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर अद्यापही सर्वसामान्य प्रवाशांना या सेवेला लाभ मिळालेला नाही. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या इतर गाडय़ा सर्वासाठी सुरू करण्यात आल्या असल्या तरी उपनगरीय वाहतुकीबाबत रेल्वेकडून राज्य शासनाच्या आदेशाकडे बोट दाखविले जात आहे. त्यानुसार राज्य शासनाने मुंबईबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतुकीसह पुणे-दौंड, पुणे-बारामती आदी मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टाळेबंदीपूर्वी पुणे-लोणावला उपनगरीय रेल्वेच्या चाळीसहून अधिक फेऱ्या होत होत्या. विद्यार्थी, कामगार, व्यापारी आदी वर्गासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज सुमारे एक लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते. सध्या पुणे, िपपरी-चिंचवड शहरांतील र्निबधात शिथिलता देण्यात आली आहे. महाविद्यालये बंद असली, तरी कामगार आणि व्यापारी वर्गाला या सवेची अत्यंत आवश्यकता असल्याने ती सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा याबाबत म्हणाल्या, की मुख्यमंत्र्यांनी केवळ मुंबईकरिता निर्णय घेताना इतर विभागातील प्रवाशांचा विचार केला नाही. रेल्वेच्या इतर गाडय़ा सुरू आहेत,पण पुणे-लोणावळा, पुणे-दौंड, पुणे-बारामतीसह विविध मार्गावर उपनगरीय सेवा सुरू नाही. त्यामुळे अनेकांची गैरसोय होते आहे. त्यामुळे या मार्गावरही मुंबईप्रमाणे उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची मुभा द्यावी. क्यूआर कोड बंद करून तिकीट प्रवाशांना उपलब्ध करून द्यावेत.

प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड

पुणे-लोणावळा किंवा पुणे-दौंड या मार्गावरून पुण्यात रोज येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सध्या दोन्ही मार्गावर सर्वसामान्यांसाठी उपनगरीय वाहतूक बंद आहे. शिथिलतेमध्ये पीएमपी बस सुरू असल्याने बहुतांश प्रवासी आता या सेवेचा किंवा इतर पर्यायांचा वापर करीत आहेत. पण, त्यामुळे प्रवासाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. पुणे ते लोणावला या प्रवासाचे रेल्वेचे तिकीट २० रुपये आहे. या एकेरी प्रवासासाठी सध्या ६० रुपयांहून अधिकची रक्कम मोजावी लागते. त्यामुळे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने रोजचा प्रवास कराव्या लागणाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.