पिंपरी : प्रियकर सतत भांडण करतो, म्हणून प्रेयसीने दोन तरुणांच्या मदतीने प्रियकराचा खून केला. मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून निर्जनस्थळी फेकून दिला. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने प्रेयसीसह तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.

आरतीकुमारी बिजलाऊराम उराव (२३), आकाश बिजलाऊराम उराव (२१), बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (२१, झारखंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुकेश कुमार (२४) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीकुमारी आणि मुकेश यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्रित राहत होते. दरम्यान, मुकेश हा आरतीकुमारी हिला सतत मारहाण करत असे. तिच्यासोबत सतत भांडण करत असे. या त्रासाला कंटाळून आरतीकुमारी हिने तिचा लहान भाऊ आकाश आणि त्याचा मित्र बालमुनी या दोघांना सोबत घेऊन दोन ऑक्टोबर रोजी मुकेश कुमार याला डोक्यात आणि तोंडावर बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मुकेश याचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडाचीवाडी येथे निर्जनस्थळी गवतात फेकून दिला.

ही घटना चार ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे यांनी त्यांच्या पथकामार्फत आजूबाजूच्या परिसरात मृत व्यक्तीचे छायाचित्र दाखवले. कडाचीवाडी येथे राहणारे काही जण खोली खाली करून छत्रपती संभाजीनगर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित व्यक्तीचा छत्रपती संभाजीनगर येथे शोध घेत तिघांना अटक केली. चाकण पोलीस तपास करत आहेत.