पुणे : राज्यात लम्पी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. राज्यातील सत्तर टक्के गोवंशाचे लसीकरण पूर्ण झाले असून, रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी झाला आहे. बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही पुढील दहा दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव झालेल्या सुमारे बाराशे गोवंशाचा मृत्यू झाला असून, बाधित जनावरांची संख्या ३६ हजारांवर गेली आहे.

पशुसंवर्धन विभागाने लम्पी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर राबविल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील एकूण २०२३ गावांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बाधित गावांतील एकूण ३५,७१० बाधित पशुधनापैकी एकूण १६,३०२ गोवंश उपचाराने बरा झाला आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुरुवारअखेर एकूण १०६.६२ लाख लस मात्रा उपलब्ध आहेत. बाधित क्षेत्राच्या पाच किमी परिघातील २०२३ गावांतील ४८.२८ लाख आणि परिघाबाहेरील ३८.९१ लाख पशुधन असे एकूण ८७.१९ लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

स्थिती काय?

जळगाव, नगर, पुणे, अमरावती आणि कोल्हापुरात लम्पीने मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या अधिक आहे. राज्यात गुरुवार, २९ सप्टेंबरअखेर एकूण १२५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

संसर्गवेगाला आवर..

गुरांचे सरासरी ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अकोला, जळगाव, मुंबई जिल्ह्यांत शंभर टक्के, तर बीड, कोल्हापूर, नगर जिल्ह्यात ९५ टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचा वेग कमी झाला आहे.

जळगाव आणि अकोला या सर्वात जास्त बाधित जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण झाले आहे. इतर जिल्ह्यांतील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील लसीकरण अंतिम टप्प्यात आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाची आकडेवारी पाहता सुमारे एक कोटी गोवंशाचे म्हणजे सत्तर टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील तीन ते चार दिवसांमध्ये बाधित पशुधनाच्या संख्येत, तसेच बाधित होणाऱ्या गावांच्या संख्येत घट दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त पशुसंवर्धन विभाग