पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांना लाखो रुपयांच्या गंडा घालणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली. तोतया लष्करी अधिकाऱ्याच्या विरोधात पंजाबमधील पठाणकोट येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

संजय रघुनाथ सावंत (रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. सावंत हा देहुरोड परिसरातील लष्कराच्या डीओडी डेपोमध्ये ट्रेडमन म्हणून काम करत होता. दोन वर्षांपुर्वी तो निवृत्त झाला आहे. त्यानंतर सावंत आणि साथीदारांनी पठाणकोटमध्ये लष्करात नोकरीला लावण्याचे आमिष तरुणांना दाखविले होते. लष्करात कर्नल दर्जाचा अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती. तरुणांच्या कुटुंबीयांकडून २३ ते २५ लाख रुपये उकळून तो पसार झाला होता.

या प्रकरणी पठाणकोट पोलिसांनी सावंत आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. फसवणूक प्रकरणात सावंतच्या दोन साथीदारांना पठाणकोट पोलिसांनी अटक केली होती. सावंतचा शोध घेण्यात येत होता. तो पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला (मिलिटरी इंटलिजन्स) मिळाली. याबाबतची माहिती पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आली.

त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक विकास जाधव, राजस शेख, संजय आढारी, प्रवीण भालचिम तसेच लष्करातील गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने कारवाई करुन सावंतला पकडले

तोतया अधिकारी रिक्षाचालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तोतया लष्करी अधिकारी संजय सावंत पिंपळे गुरव परिसरात रिक्षा चालवत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. पोलीस तसेच गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने या भागातील १५० रिक्षाचालकांची चौकशी केली. चौकशीत सावंत याचा ठावठिकाणा कळाल्यानतंर त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पठाणकोट पोलीस तपास करत आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याला पठाणकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.