पिंपरी : खेड तालुक्यात म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसाला हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सत्तूरच्या वार चुकविलेल्या पोलिसाच्या डाव्या हाताला चावा घेऊन त्याला दुखापत केल्याची घटना घडली. दीपक अशोक जंगले ( वय १९, रा. खराबवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी मरकड यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकड हे आपत्कालीन मदत करण्याचे सरकारी काम करित होते. दीपक हातात सत्तूर घेऊन आला. ‘तुम्ही इथे कशाला आला आहात’ असे म्हणून त्यांना धमकावले. सरकारी कामात अडथळा निर्माण करून सत्तूरसह मरकड यांच्या अंगावर धावून गेला. ‘आता तुम्हाला जिवंत सोडत नाही’ असे बोलून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने मरकड यांच्यावर वार केला. मरकड यांनी वार चुकवून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने झटापट करून त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला आणि दुखापत केली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

आळंदीत हरवलेल्या फोनमधून ऑनलाइन पैसे लंपास

आळंदी येथे एका अज्ञात व्यक्तीने हरवलेल्या मोबाइल फोनचा गैरवापर करत एका नागरिकाच्या बँक खात्यातून एक लाख ५४ हजार ८१७ रुपये ऑनलाइन काढून घेतले. ही घटना २५ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान आळंदीत घडली. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादींचा हरवलेला मोबाईल फोन वापरून त्यातील फोन पे ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश केला. फोन पे ॲपचा पासवर्ड वापरून त्याने फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डमधून ६८ हजार ८१७ रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ८६ हजार रुपये असे एकूण एक लाख ५४ हजार ८१७ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

चिखलीत मोबाइल चोरीप्रकरणी एकाला अटक

चिखलीतील जाधववाडी येथे घरातून मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी फरीन मुस्ताक खान (२९, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागेश देवेंद्र गलबिले (४१, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरातील शयनगृहातून २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन आरोपीने चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

पिंपरीत श्वान अंगावर आल्याच्या वादातून तरुणाला लुटले

रस्त्यावर श्वान अंगावर आल्यामुळे दुचाकीसह थांबलेल्या एका तरुणाला तिघांनी मारहाण करून लुटले. ही घटना बुधवारी पिंपरीत घडली. याप्रकरणी प्रणय कुमार स्वाईन (३८, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुदर्शन महादेव थोरात (१८, पिंपरी) आणि यश चंदु कांबळे (१८, पिंपरी) या दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय दुचाकीवरून जात असताना त्यांच्या अंगावर एक श्वान धावून आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवली. त्यावेळी मागून येणाऱ्या एका रिक्षातील आरोपींनी त्यांना ‘तू ब्रेक का मारला, त्यामुळे आम्ही पडलो असतो, आमची भरपाई दे’ असे म्हणून वाद घातला. आरोपींनी फिर्यादीला धमकावून त्याच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याच्या फोन पे खात्यातून तीन टप्प्यात एकूण ६५०० रुपये ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून घेतले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

दारू विक्री करणाऱ्या महिलेविरूद्ध गुन्हा

मावळ तालुक्यातील चांदखेड येथे एका महिलेवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रामेश्वर जाधवर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चांदखेड येथील ३० वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड ते कासारसाईकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडेला आरोपी महिलेने २१ हजार ५०० रुपये किमतीचा दारूचा साठा बेकायदेशीरपणे आणि परवान्याशिवाय जवळ बाळगला होता. पोलीस आल्याची माहिती मिळताच महिला झाडाझुडपांचा फायदा घेऊन पळून गेली. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करत आहेत.