पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) प्रस्तावित मार्गिकांसाठी १२ नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत बनविण्यात येणाऱ्या ‘टीटागढ रेल सिस्टीम लिमिटेड’ आणि ‘टीटागढ फिरेमा’ या दोन कंपन्यांना डबे बनविण्याचे काम देण्यात आले असून, त्यासाठी ४३०.५३ कोटी रुपयांचा करार करण्यात आला केला. अडीच वर्षांत या गाड्या महामेट्रोकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील पीसीएमसी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार महामेट्रोकडून पीसीएमसी ते निगडी या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गिका प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवून लवकरच ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी नवीन १२ मेट्रो ट्रेनची आवश्यकता असल्याने महामेट्रोने गाड्यांचे डबे तयार करण्यासाठी पूर्वीच्याच ‘टीटागढ रेल सिस्टीम लिमिटेड’ आणि ‘टीटागढ फिरेमा’ या दोन कंपन्यांसोबत खरेदी करार केला असल्याची माहिती मंगळवारी महामेट्रोकडून देण्यात आली.
डब्यांची रचना कशी?
महामेट्रोच्या नियमानुसार प्रत्येक गाडीला दोन स्वतंत्र इंजिन आणि तीन प्रवासी डबे (कोच) आहेत. हे डबे ॲल्युमिनिअम धातूपासून निर्मित असतील. प्रवाशांसाठी वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे, स्वयंचलित उद्घोषणा, आसन व्यवस्था आणि माहिती दर्शवणारी इलेक्ट्रिक यंत्रणा (डिस्प्ले) उपलब्ध असेल.
काय होणार परिणाम?
सद्य:स्थितीला स्वारगेट ते पीसीएमसी आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांवर ३४ आठ मिनिटांच्या वारंवारितेनुसार प्रवास सेवा दिली जाते. नवीन गाड्यांमुळे मेट्रोच्या गाड्यांची संख्या ४६ पर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे मेट्रोची वारंवारिता पाच मिनिटांवर येऊ शकणार आहे.
‘महामेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गांसाठी नवीन १२ गाड्या खरेदी करण्यात येणार असून, पूर्वीप्रमाणेच डब्यांची रचना असणाऱ्या गाड्यांसाठी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. या विस्तारित मार्गिकेचे बांधकाम पूर्ण होताच मेट्रो सेवा पुरवणे शक्य होईल. त्यामुळे पीसीएमसी ते निगडी या मार्गातील प्रवाशांना फायदा होईल.’- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे</strong>