पुणे : गणेशोत्सव काळात मेट्रोसेवा पुणेकरांना अधिक काळ मिळणार असून, ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात २० तास सेवा ‘मेट्रो’ देणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे विभागाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे विभागाने १५ ऑगस्टपासून मेट्रोच्या फेऱ्या सहा मिनिटांवर आणल्या होत्या. आता गणेशोत्सवानिमित्त मेट्रोसेवा सुरू असण्याची वेळ आठ दिवस वाढवली आहे. सध्या रोज १७ तास मेट्रो धावत आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या वेळेत वाढ करण्यात आली असून, रात्री दोन वाजेपर्यंत (२० तास) मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. तर, ६ आणि ७ सप्टेंबर रोजी सलग ४१ तास मेट्रो सुरू ठेवण्यात येणार आहे. मेट्रोच्या निर्णयाचा गणेशभक्तांना फायदा घेता येणार आहे.
पुण्यातल्या गणेशोत्सवाचे जगभर आकर्षण असते. या काळात प्रवासी जाण्या-येण्यासाठी मेट्रोला पसंती देतात. यंदा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ही भूमिगत मेट्रोही सुरू झाली आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट ही पुण्याच्या मध्य वस्तीत असलेली स्थानके असून, या परिसरात प्रतिष्ठित आणि मानाची गणेशमंडळे आहेत.
मध्यवर्ती पेठांच्या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मेट्रोच्या वेळेत बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
कसे असणार वेळापत्रक?
दिनांक – वेळ – एकूण वेळ
२७ ते २९ ऑगस्ट – सकाळी ६ ते रात्री ११ – १७ तास
३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर – सकाळी ६ ते रात्री २ – २० तास
६ आणि ७ सप्टेंबर – सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी रात्री ११ पर्यंत – ४१ तास
पुणेकरांसह देशविदेशातून येणाऱ्या भाविकांना यंदाचा गणेशोत्सव पुणे मेट्रोच्या जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासासह साजरा करता येणार आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेली ही सुविधा शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठीही सकारात्मक पाऊल ठरणार असून, प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे