डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या धक्क्य़ातून सावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मोहिमा सुरू केल्या आहेत. गणेशमूर्ती रंगवण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर थांबवण्याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सूचना देऊनही शासनाने गणेशमूर्ती रंगवण्यासाठी रासायनिक रंग वापरण्यावर बंदी घालणारा अध्यादेश अजून का काढलेला नाही, असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंबंधी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासंबंधी झालेल्या पत्रकार परिषदे वेळी समिताचे राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख उपस्थित होते. गणेश मूर्तीच्या रंगकामासाठी रासायनिक रंग वापरण्यात येऊ नयेत यासाठी समिती प्रयत्न करत आहे. मात्र, शासनाने याबाबत अध्यादेश काढलेला नाही. डॉ. दाभोलकरांची हत्या झाली, त्यादिवशी याच विषयी ते पत्रकार परिषद घेणार होते.
या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी सांगितले,‘‘महाराष्ट्रात साधारण एक कोटी लोक घरी गणपती बसवतात. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक मंडळे आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणाऱ्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यातील बहुतेक मूर्तीसाठी रासायनिक रंग वापरलेले असतात. त्यामुळे साहजिकच प्रदूषण होते. त्याचप्रमाणे पीओपी पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीसाठीही शाडूची माती, कागदाचा लगदा यापासून तयार होणाऱ्या मूर्तीचा पर्याय आहे. नागपूर आणि साताऱ्यातील पालिकांनी पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. गुजरात राज्यामध्येही पीओपीच्या मूर्तीवर बंदी आहे. असे असतानाही आपल्याकडे मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा या दृष्टीने शासनाने काही पावले अजूनपर्यंत उचललेली नाहीत. याबाबत बठक घेण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी दिले आहे.’’
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धुरा पाटील यांच्या खांद्यावर
डॉ. दाभोलकरांनी काही महिन्यांपूर्वी संस्थेची जबाबदारी कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे सोपवली होती. ते संस्थेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नव्हते. त्यामुळे यापुढे संस्थेचे कामकाज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणार असल्याची माहिती  संस्थेचे राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख यांनी दिली. संस्थेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.