पुणे : राज्यात मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसाच्या काळात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद झाली. तर अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी असून, अतिवृष्टी आणि पुराच्या राज्यात ६९ घटना नोंदवल्या गेल्या. भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हवामानाच्या तीव्र घटनांची माहिती देण्यात आली आहे. अहवालात देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात वीज पडण्याच्या एकूण ४२८ घटना घडल्या. त्यात सर्वाधिक चंदीडमध्ये ८५, उत्तर प्रदेशात ८१, झारखंडमध्ये ६२ घटना नोंदवल्या गेल्या. देशभरात पूर आणि अतिवृष्टीच्या एकूण ५४४ घटनांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक हिमाचल प्रदेशमध्ये १२३ घटना घडल्या. त्या खालोखाल महाराष्ट्रात ६९, उत्तराखंडमध्ये ६८, राजस्थानमध्ये ४५ घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटा उत्तर प्रदेशात ८३ , झारखंडमध्ये २५, तर महाराष्ट्रात तीन नोंदवल्या गेल्या. वादळी पावसाच्या घटनांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात, महाराष्ट्रात दोन आणि आसाममध्ये एक घटना नोंदवल्याची माहिती अहवालात देण्यात आली. हेही वाचा. सावधान! हृदयविकाराचा धोका आता कमी वयात वाढतोय हेही वाचा. प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन हवामानाच्या तीव्र घटना हे हवामान विभागापुढील मोठे आव्हान आहे. यंदा देशभरात घडलेल्या घटनांची प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून माहिती घेऊन माहिती अंतिम करण्यात येईल. त्यात हवामानाच्या तीव्र घटनांमुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.