पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीची विक्री करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. त्यानुसार ९९ एकर २७ आर एवढ्या जागेची विक्री २३१ कोटी २५ लाख रुपयांना करण्यात येणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारासाठी याखरेदी करण्यात येणार आहे. जमिनीच्या विक्रीचा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे यशवंत सहकारी साखर कारखाना तोट्यात सापडला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा कारखाना बंद असून कारखान्यापुढे मोठी आर्थिक आव्हाने निर्माण झाली होती. त्यामुळे कारखान्याकडील जमिनींची विक्री करून हा कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीला काही प्रमाणात विरोधही झाला होता. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळाने कारखान्याची जमिनीची विक्री करण्यास मंगळवारी मान्यता दिली.साखर कारखान्याच्या ९९ एकर २७ आर जमिनीची विक्री या निर्णयानुसार होणार आहे. ही जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी खरेदी करण्याचे नियोजित आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सरफेसी ॲक्टनुसार यशवंत सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला होता. हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा, यासाठी कारखान्याच्या २६ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आर्थिक सर्वसाधारण सभेत ९९ एकर २७ आर जागेची विक्री पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला करण्यात यावी आणि विविध बँका, कामगार, कर्मचारी, शेतकरी तसेच अन्य शासकीय देणी यातून भागविण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार चालू बाजारमूल्यानुसार (रेडिरेकनर) २३१ कोटी २५ लाख रुपयांना या जागेची विक्री करण्यात येणार आहे. या जमिनीची विक्री किंवा जागेचा वापर अन्य कोणत्याही कारणासाठी बाजार समितीला करता येणार नाही, अशी अट मंत्रिमंडळाने घातली आहे.