राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हडपसर भागात पालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या उद्यानाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. पण या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आणि ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पोहोचताच नगरसेवकाला उद्यानाला आपलं नाव देण्यासंबंधी विचारलं आणि एक सल्लाही दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून हे उद्यान उभं केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या उद्यानाचं उद्धाटन करण्याचं नियोजन होतं. मात्र अनेक स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्याना’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आजच होणार होतं उद्घाटन पण…

दरम्यान, एकनाथ शिंदे पुण्यात पोहोचले असता प्रमोद भानगिरे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. गाडीतून उतरताच एकनाथ शिंदे प्रमोद भानगिरे यांना ‘अरे बाबा माझ्या नावे कशाला उद्यान बांधलं? दिघे साहेबांचं नाव द्यायचं ना,’ अशा शब्दांत खडसावलं.

“मुख्यमंत्र्यांची यात काहीही चूक नाही”

“मुख्यमंत्र्यांची यात काहीही चूक नाही, जे काही केलं आहे मी केलं आहे,” असं भानगिरे यांनी टीव्ही ९ शी बोलताना स्पष्ट केलं आहे. ” प्रशासनासोबत मीच पत्रव्यवहार केला होता. या उद्यानाला नामदार एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मीच प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यावेळी माझी नगरसेवक पदाची मुदत संपली होती. त्यामुळे एकमताने प्रस्ताव संमत झाला नाही किंवा मंजुरीला गेला नाही,” असं भानगिरे म्हणाले.

‘एकनाथ शिंदे उद्याना’चे आज मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन! ; वैयक्तिक नाव न देण्याच्या पुणे पालिकेच्या ठरावाला केराची टोपली

त्या ठरावाला केराची टोपली दाखवत देण्यात आलं नाव

महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांच्या कुटुंबीयांची नावे उद्यानांना आणि अन्य वास्तूंना दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी गुलटेकडी भागातील सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला भाजपच्या नगरसेवकाने त्यांच्या वडिलांचे नाव दिले होते. त्याविरोधात सॅलिसबरी पार्क कृती समितीने आक्षेप घेत त्याविरोधात लढा सुरू केला आहे. ही घटना ताजी असतानाच एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख म्हणून नियुक्त केलेले माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरात उद्यान विकसित करुन त्याला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले होते. महापालिकेचा ठरावाला केराची टोपली दाखवत नाव देण्यात आल्याने वाद निर्माण झाल्यानंतर उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde on his name given to garden in pune shivsena corporator pramod bhangire sgy
First published on: 02-08-2022 at 14:08 IST