पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून उभारलेल्या या उद्यानाचे उद्घाटन आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होते. मात्र अनेक स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> संजय राऊतांना ‘ईडी’कडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर शिंदे यांच्या नावाने उद्यान उभे राहिले असून, त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार होते. मात्र या उद्यानाला शिंदे यांचं नाव देण्यास स्वयंसेवी संघटनांनी कडाडून विरोध केला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये दुपारच्या सुमारास या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम माजी स्थानिक नगरसेवक प्रमोद बानगिरे यांनी रद्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

“मुख्यमंत्र्यांची यात काहीही चूक नाहीय जे काही केलं आहे मी केलं आहे,” असं भानगिरे यांनी टीव्ही ९ शी बोलताना स्पष्ट केलं आहे. ” प्रशासनासोबत मीच पत्रव्यवहार केला होता. या उद्यानाला नामदार एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मीच प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यावेळी माझी नगरसेवक पदाची मुदत संपली होती. त्यामुळे एकमताने प्रस्ताव संमत झाला नाही किंवा मंजुरीला गेला नाही,” असं भानगिरे म्हणाले.

नक्की वाचा >> “राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, सर्वांनी…”; राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

“एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार, त्यानुसार पुढील काळात काम करणार आहे. त्याचबरोबर उद्यानाचे उदघाटन होणार नसल्याने, एकनाथ शिंदे त्या ठिकाणी भेट देतील. त्यानंतर फुटबॉल मैदानाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे,” असंही भानगिरेंनी स्पष्ट केलंय.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

तसेच भानगिरे यांनी या ठिकाणी पूर्वी परिस्थिती फार चांगली नव्हती अशी माहिती दिली. सध्या ज्या जमीनीवर उद्यान साकारण्यात आले आहे तिथे पूर्वी गर्दुल्यांचा अड्डा होता आणि स्थानिकांना त्याचा त्रास होत असल्याचा दावा भानगिरेंनी केलाय. “पूर्वीची तुम्ही परिस्थिती पाहिली तर इथं दारु पिऊन गर्दुले बसायचे. इथे राहणारे सर्व लोकांची मागणी होती की या ठिकाणी उद्यानाची निर्मिती करायची. त्यांची अडचण लक्षात घेऊन मीच पुढाकार घेतला,” असं भानगिरे म्हणाले. सध्या या उद्यानाचा नामफलक झाकण्यात आलाय.

नक्की वाचा >> “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

त्या ठरावाला केराची टोपली दाखवत देण्यात आलं नाव
महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांच्या कुटुंबीयांची नावे उद्यानांना आणि अन्य वास्तूंना दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी गुलटेकडी भागातील सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला भाजपच्या नगरसेवकाने त्यांच्या वडिलांचे नाव दिले होते. त्याविरोधात सॅलिसबरी पार्क कृती समितीने आक्षेप घेत त्याविरोधात लढा सुरू केला आहे. ही घटना ताजी असतानाच शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख म्हणून नियुक्त केलेले माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरात उद्यान विकसित केले आहे. या उद्यानाला त्यांनी एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. महापालिकेचा ठरावाला केराची टोपली दाखवत नाव देण्यात आले आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ignoration of eknath shinde garden in pune hadapsar is cancelled cm shinde suppose to be chief guest scsg
First published on: 02-08-2022 at 10:03 IST