बारामती शहर आणि तालुक्यात करोनाप्रतिबंधक उपाययोजनांची अमलबजावणी युद्धपातळीवर करा. करोनारुग्णांचे वाढते प्रमाण गंभीर असून या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने करोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात करोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत, नागरिकांकडून त्या निर्बंधांचे पालन केले जाईल यासाठी दक्ष राहून काम करा. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसेच निधीचीही कमरतरता पडू दिली जाणार नाही. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, ऑक्सिजन वापराबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक वापर करावा,” असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती येथील पदाधिकारी , वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, “ज्या भागामध्ये करोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे त्याठिकाणी कडक निर्बंध करावेत. आरोग्य विभागामध्ये भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. ऑक्सिजनपुरवठा करण्यात येईल, परंतु गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिवीर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी. आरोग्यविषयक कोणत्याही साधन सामुग्रीची कमतरता असल्यास तत्काळ कळवावे, सुपर स्प्रेड गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. पोलीस विभागाने विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी,” इत्यादी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deputy cm ajit pawar coronavirus baramati vaccination sgy
First published on: 16-04-2021 at 14:18 IST