पुणे : ‘प्रत्येक राज्यव्यवस्थेत एक प्रमुख व्यक्ती असते आणि ती घाशीराम कोतवाल निर्माण करते. वापर झाला, की घाशीरामला फेकून दिले जाते,’ असे भाष्य ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी केले.
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी डॉ. पटेल आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची मुलाखत घेतली. नाटकांमध्ये राजकीय भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाच्या प्रसंगांवरील प्रश्नांवर डाॅ. पटेल यांनी मत व्यक्त केले. गांधी समितीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. शिवाजी कदम, लक्ष्मीकांत देशमुख, सचिव अन्वर राजन, डॉ. एम. एस. जाधव, स्वप्नील तोंडे उपस्थित होते.
डाॅ. पटेल म्हणाले, ‘देशातील व्यवस्थेचे वास्तव दर्शवणारी तीन नाटके मला करता आली. यामध्ये व्यवस्था आणि तिचा सोयीनुसार वापर, हे अनुभवता आले. त्यामुळे ‘सामना’ चित्रपटात मारुती कांबळे हे पात्र प्रसिद्ध झाले. विजय तेंडुलकर यांच्यावर ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे लेखन करताना खूप दबाव होता. मात्र, त्यांनी तटस्थ लेखन केले. नाटकाचे १९ प्रयोग झाल्यानंतर प्रखर विरोध सुरू झाला.
तत्कालीन एका संस्थेच्या प्रमुखांनी राजीनामा दिल्याने नाटकाचे प्रयोग बंद केले. मात्र, महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक गुण आहे, ज्या माणसाने कष्ट केले त्याचे मूळ तो कोणत्याही क्षेत्रात असला, तरी लोक त्याला विसरत नाही. एक वर्षाने ते नाटक आम्ही परत सुरू केले. लोकांनी ते नाटक डोक्यावर घेतले आणि त्याचे ८०० पेक्षा अधिक प्रयोग देश-परदेशात यशस्वी झाले.’
‘प्रवृत्तीमुळे प्रश्न कायम’
‘नाटक, साहित्य, संगीत, कला या गोष्टी समाजाला एकत्रित आणतात. घाशीराम ही विशिष्ट परिस्थितीतील व्यक्तिरेखा आहे. ‘मारुती कांबळेचे काय झाले’ हा प्रश्न वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे पन्नास वर्षांनंतरही कायम राहणार आहे,’ असे मत डाॅ. आगाशे यांनी व्यक्त केले, तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी जातिवाद संपुष्टात येऊन भाषावाद निर्माण झाला, अशी भावना कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली.
‘गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले…’ ‘देश स्वातंत्र्य करण्यास महात्मा गांधी यांनी प्रचंड कष्ट घेतले. अंगावरच्या साध्या कपड्यांवर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात लढा दिला, ही असामान्य बाब आहे. मात्र, त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींनी गांधींमुळेच स्वातंत्र्य कसे मिळाले, हा प्रश्न विचारणे योग्य नाही,’ अशी भावना डाॅ. पटेल यांनी व्यक्त केली.