पुणे : ‘विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातून येणाऱ्यांना अनुदान ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टीच आहे,’ अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. तर, अनुदानापेक्षाही मराठी भाषा आणि साहित्याविषयीची तळमळ महत्त्वाची असल्याचे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रेल्वे तिकिटातही सुविधा नाही, पण परदेशातून येणाऱ्या अनिवासी मराठीजनांना विश्व मराठी संमेलनासाठी तब्बल ७५ हजार रुपयांचे अनुदान, असे विरोधाभासी चित्र सध्या राज्यात निर्माण झाले आहे. दोन्ही संमेलनांचे आपापले स्वतंत्र उद्देश असले, तरी मराठी भाषा हा समान धागा असल्याने या विरोधाभासाबाबत साहित्य वर्तुळात मोठी चर्चा आहे. त्या संदर्भात ‘विश्व मराठी संमेलनाच्या पाहुण्यांवर खैरात’ या ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू

‘दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ इच्छिणाऱ्या साहित्यप्रेमींना रेल्वे भाड्यामध्ये सवलत नाही आणि विश्व मराठी संमेलनास येणाऱ्या अनिवासी भारतीयांना मात्र येण्या-जाण्यासाठी अनुदान यामध्ये निश्चितच विचित्र विरोधाभास दिसून येतो,’ अशी प्रतिक्रिया माजी संमेलनाध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी भारत सासणे यांनीही व्यक्त केली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीमध्ये होत असलेले साहित्य संमेलन हे केवळ सरहद संस्थेचे किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नाही. तर, हे मराठीच्या अस्मितेचे आणि समस्त मराठी माणसांचे संमेलन आहे. कोणाला कशा प्रकारे सहकार्य करावे हा शासनाचा विषय आहे. त्यामुळे विश्व मराठी संमेलनाविषयी भाष्य करणे योग्य होणार नाही. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वे मंजूर झाली, याचा आनंद आहे. – संजय नहार, अध्यक्ष, सरहद पुणे</strong>

हेही वाचा : Pune VVIP Visits : पुण्यात ‘व्हीव्हीआयपीं’चा राबता; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे ८५३ दौरे; पोलीस प्रशासनावर ताण

ज्यांची स्वखर्चाने येण्याची ऐपत आहे, त्यांना अनुदान ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे. सरकार ही माय असते. त्याच मायेने मराठी भाषेच्या उपक्रमांकडे पाहिले जाण्याची आवश्यकता आहे. – डॉ. श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आपण विश्व मराठी संमेलन म्हणतो, त्या वेळी विश्वामध्ये ठिकठिकाणी पसरलेल्या मराठी माणसांचा एकत्रित समावेश अपेक्षित असला, तरी ज्याने त्याने आपापल्या आर्थिक बळानुसार उपस्थित राहणे सयुक्तिक असून, त्यासाठी अनुदानाची अपेक्षा करण्याची गरज नाही, असे परदेशातल्याच विवेकी व्यक्तींनी जाहीर केले आहे. – भारत सासणे, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

हेही वाचा : नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’, सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक यंत्रणा

मराठी भाषा आणि साहित्याविषयीची आस्था आणि तळमळ महत्त्वाची आहे. त्यामुळे खरे साहित्य रसिक हे सरकारकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता साहित्य संमेलनाला जात आले आहेत. सरकार आपल्या परीने मदत करतच असते. त्यामध्ये कधी कमी-अधिक होत असते. पण, अनुदान या विषयाला गेल्या काही वर्षांत अकारण महत्त्व आले आहे. त्याच्या पलीकडे जाऊन साहित्याच्या ओढीने संमेलनाला जाण्याची तळमळ महत्त्वाची आहे. – डॉ. अरुणा ढेरे, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विश्व मराठी संमेलन हे दोन्ही मराठी भाषेवर प्रेम करण्याचे प्रयत्न आहेत. साहित्य संमेलन हा भाषा आणि साहित्याचा उत्सव आहे. तर, जगभरात मराठी भाषिकांचे जाळे विस्तारण्याचा विश्व मराठी संमेलनाचा उद्देश असावा, असे मला वाटते. या दोन विषयांची तुलना करणे योग्य होणार नाही. – राजेश पांडे, संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव