पुणे : राज्यात हजारो जण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाबाबत जागृती नसल्याने यासाठी फारसे नागरिक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अवयवदानाची मोहीम तळागाळात पोहोचविण्यासाठी आशा स्वयंसेविकांवर मोठी जबाबदारी देणार आहे. या माध्यमातून राज्यातील खेड्यापाड्यांत ही मोहीम पोहोचून अवयदानात वाढ होण्यास मदत होणार आहे.

राज्यात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘अंगदान–जीवन संजीवनी अभियान’अंतर्गत ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानात आता राज्याच्या आरोग्यसेवेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांना सहभागी केले जाणार आहे. आशा स्वयंसेविकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरोघरी या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार शक्य होणार आहे. या मोहिमेसाठी आशा स्वयंसेविकांना १२ ऑगस्टला ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण सत्रात राज्य आशा कक्ष व राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, पुणे यांच्या वतीने थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अवयवदानाचे सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व स्पष्ट करण्यात येणार आहे. या विषयावर आशा स्वयंसेविकांना आवश्यक माहिती व अवयवदान संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ८० हजारांपेक्षा अधिक आशा कार्यकर्त्या या राज्यातील विविध जिल्ह्यांतून या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी https://tinyurl.com/RegisterASHA या लिंकवर जाऊन नोंदणी करावी आणि https://tinyurl.com/ODAwarenessBatch2 या लिंकवरून थेट सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

एखाद्या मेंदूमृत व्यक्तीचे अवयव दुसऱ्या अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. मात्र त्यासाठी समाजात विश्वास निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि अंधश्रद्धा मोडून काढणे आवश्यक आहे. राज्यभरातील आशा कार्यकर्त्या या प्रशिक्षणात सहभागी होणार असून, त्यांच्या माध्यमातून अवयवदानाबाबतची जनजागृती आशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून अधिक व्यापक प्रमाणात घडवून आणता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

अवयवदानाविषयी जागरूकता वाढवणे, भीती व गैरसमज दूर करून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण पातळीवर आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही माहिती गावोगावी पोहोचवता येणार आहे. – डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आरोग्य विभाग