पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, ५ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाबाबतची माहिती दिली. यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आल्या. तसेच, १५ मेपूर्वी दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.
काय करावे ?
● सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६), श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील.
● जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार आणि खासगी विद्यार्थ्यांसाठी ७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार.
● उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य.
● छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीद्वारे संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
● गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी https:// mahahsscboard. in या संकेतस्थळाद्वारे ६ ते २० मे या कालावधीत स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाइन अर्ज करण्याची सोय.