पुणे : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या शालार्थ आयडी मान्यतेसंदर्भात सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता शालार्थ आयडी प्रक्रियेत ई-ऑफिस प्रणालीचा वापर करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीची प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते शालार्थ प्रणालीद्वारे करण्यात येतात. मात्र, नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता शालार्थ आयडीबाबत सुधारित कार्यपद्धत लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
सुधारित कार्यपद्धतीनुसार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावासह मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाने शालार्थ मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. संबंधित वैयक्तिक मान्यता, शालार्थ प्रस्ताव ई-ऑफिस प्रणालीमध्ये आवक नोंदीसह स्वीकारावा. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (मुंबई) यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मान्य झाल्यास वैयक्तिक मान्यता आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह प्रसिद्ध करावेत.
वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रस्ताव शालार्थ मान्यतेसाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी वैयक्तिक मान्यतेच्या आदेशासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ई-ऑफिसमार्फत सादर करावा. याच ई-ऑफिसमधील प्रस्तावावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक, शिक्षकेतर पदावरील कर्मचाऱ्यांच्या शालार्थबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल. प्रस्ताव मान्य झाल्यानंतर शालार्थ आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह प्रसिद्ध करावेत.
विभागीय शिक्षण उपसंचालकांनी उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव, ई-ऑफिस जावक क्रमांकासह वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ मान्यतेसाठीचा प्रस्ताव ई-ऑफिसमार्फत विभागीय मंडळ अध्यक्षांकडे सादर करावा. प्रस्ताव मान्य झाल्यास शालार्थ आयडीचे आदेश ई-ऑफिसच्या जावक क्रमांकासह प्रसिद्ध करावेत.
विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय मंडळ अध्यक्ष यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्तावासोबत शालार्थकरिता प्राप्त झालेली कागदपत्रे, मूळ वैयक्तिक मान्यता आदेशाच्या आधारे शालार्थ मान्यता, अमान्यतेचे आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह प्रसिद्ध करावेत. शालार्थ मान्यता आदेशाच्या दिनांकापासून तीन कामकाजाच्या दिवसांमध्ये शालार्थ प्रणालीत संबंधित नाव समाविष्ट करून याच प्रणालीवर अपलोड करावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
आदेश चुकीचा असल्यास सुनावणी
विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्षांना वैयक्तिक मान्यता आदेश चुकीचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित कर्मचारी, शाळा व्यवस्थापन सचिव, अध्यक्ष, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व संबंधितांची विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्ष यांनी सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता वैध-अवैध असल्याबाबत निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.