या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठ पंचायत समित्यांमध्येही वर्चस्व – भाजपचा प्रवेश; काँग्रेसला मोठा फटका

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांची सत्ता भारतीय जनता पक्षाने खेचून नेली असली, तरी पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ७५ पैकी ४४ जागांवर विजय संपादन करीत निर्विवाद बहुमत मिळविले. १३ पैकी आठ पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले. जिल्हा परिषदांमध्ये प्रथमच मोठी ताकद लावलेल्या भारतीय जनता पक्षाने सात जागांवर विजय मिळविला. १३ जागा मिळवून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शिवसेनेने तीन पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व मिळविले असून, भाजप व काँग्रेसने प्रत्येकी एका पंचायत समितीमध्ये वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आंबेगाव, शिरूर, मुळशी, हवेली, दौंड, भोर, बारामती आणि इंदापूर या पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळविले. जुन्नर, पुरंदर, खेडमध्ये शिवसेनेने, तर मावळात भाजप आणि वेल्हे येथे काँग्रेसने यश मिळविले.

मावळमध्ये सलग चवथ्यांदा भाजप

लोणावळा- मावळ तालुक्यात सलग चवथ्यांदा विजय मिळवत भाजपने तालुक्यावरील पकड कायम राखली. पंचायत समितीच्या सहा जागा जिंकत भाजपाने सत्ता मिळवली. बंडखोरी होऊनही राष्ट्रवादीने ४ जागांवर विजय मिळवत मागच्या पेक्षा चांगली कामगिरी केली. शिवसेनेचा मात्र सफाया झाला. जिल्हा परिषदेची एक जागा मात्र यावेळी भाजपाला गमवावी लागली. मावळात भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

जि. प. मधील विजयी उमेदवार- शोभा सुदाम कदम (राष्ट्रवादी), नितीन मराठे (भाजपा), बाबुराव वायकर (शिवसेना पुरस्कृत), अलका गणेश दानिवले (भाजपा), कुसुम ज्ञानेश्वर काशीकर (राष्ट्रवादी).

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

शिरूर- भाजप ,राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला. भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे याचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या जयश्री पलांडे यांनाही पराभव स्वीकारावा लागला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने निर्वविाद वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या घरातील नातेवाईक विविध पक्षांचे उमेदवार म्हणून मदानात होते. त्यामुळे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

जि. प. मधील विजयी उमेवार- सुनीता गावडे, राजेंद्र जगदाळे, सविता बगाटे, धैर्यशील मांढरे, सुजाता पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा बांदल (लोकशाही क्रांती आघाडी) स्वाती पांचूदकर.

इंदापूरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम

इंदापूर- पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने चौदा जागांपकी आठ जागा जिंकून आपली सत्ता कायम ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. भाजप व अन्य पक्षांना कोणत्याही गटात खाते उघडता आले नाही. आजी-माजी आमदारांचे नातलग, उद्योगपती पुत्र असे दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पंचायत समिती पुन्हा ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. हर्षवर्धन यांच्या आई श्रीमती रत्नप्रभा पाटील बावडा लाखेवाडी गटातून विजयी झाल्या आहेत.

जि. प. मधील विजयी उमेदवार- हनुमंत बंडगर, प्रवीण माने, अभिजित तांबिले, भारती दुधाळ, सागर भोसले, रत्नप्रभा पाटील,  वैशाली पाटील.

पुरंदरमध्ये शिवसेनेची भगवी लाट

जेजुरी- पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांपकी तीन जागा तर पंचायत समितीच्या आठ पकी सहा जागा जिंकून शिवसेनेने सर्व प्रस्थापितांना धक्का दिला. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पुरंदरला गुंजवणी धरणाचे पाणी आणण्यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली, तर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व जेजुरी औद्योगिक वसाहत विस्तारीकरण हे मुद्दे त्यांनी लावून धरले. त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. सहा सदस्य निवडून आल्याने पंचायत समिती पूर्णपणे शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.

जि. प. मधील विजयी उमेदवार- ज्योती झेंडे, दिलीपआबा यादव, शालिनी पवार (शिवसेना), दत्तात्रेय झुरंगे (काँग्रेस).

बारामतीत सर्व जागांवर राष्ट्रवादी

बारामती- तालुक्यामध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णपणे यश मिळविले. सर्वच जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. यंदा भाजपने राष्ट्रवादीला चांगली लढत दिल्याचे दिसले. त्यामुळे काही जागांवर राष्ट्रवादीला विजयासाठी झगडावे लागले. पवार कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार िरगणात होते. अपेक्षेप्रमाणे त्यांचा सर्वाधिक मतांनी विजय झाला.

जि. प. मधील विजयी उमेदवार- रोहित पवार, भरत खैरे, रोहिणी तावरे, विश्वासराव देवकाते, प्रमोद काकडे, मीनाक्षी तावरे.

दौेंडमध्येही राष्ट्रवादीची सरशी

दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सहापकी पाच जागा जिंकल्या आहेत, तर आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षाला निसटत्या मतांनी फक्त एक जागा जिंकता आली आहे. पंचायत समितीच्या १२ पकी ११ जागा जिंकून राष्ट्रवादीने निर्वविाद यश संपादित केले.

जि. प. विजयी उमेदवार- राणी शेळके, लक्ष्मण सातपुते, वीरधवल जगदाळे, सारिका पानसरे, गणेश कदम (राष्ट्रवादी पक्ष), पूनम दळवी (राष्ट्रीय समाज पक्ष).

 

जिल्हा परिषद निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस- ४४

शिवसेना- १३

भारतीय जनता पक्ष- ७

काँग्रेस- ७

राष्ट्रीय समाज पक्ष- १

इतर- ३

पंचायत समिती निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस- ७८

शिवसेना- ३२

भारतीय जनता पक्ष- १७

काँग्रेस- १६

लोकशाही क्रांती आघाडी- २

राष्ट्रीय समाज पक्ष- १

इतर- ४

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra municipal council elections results 2017 ncp win in local bodies in pune district
First published on: 24-02-2017 at 02:50 IST