राज्य सरकारच्या जबाबदार मंत्र्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या नावावर खंडण्या गोळा करण्यात येत असल्यास त्याचा निषेध असल्याचे नमूद करत कृषीमंत्री अब्दुल सत्तार कोणाच्या आशीर्वादाने खंडणीखोरी करत आहेत, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे राज्य प्रवक्ता हनुमंत पवार यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >>>पुणे: सीमकार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने पाच लाखांना गंडा; सदाशिव पेठेतील एकाची फसवणूक
सत्तार यांच्या सिल्लोड येथे १ ते १० जानेवारी या कालावधीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी राज्याच्या कृषी खात्यापासून तालुका कृषी खात्यापर्यंदत सर्व शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रवेशिका देऊन खते, बी-बियाणे, औषधे, ठिबक विक्रेते, कारखानदार आदींकडून मोठी रक्कम गोळा केली जात आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊन खंडणी वसुलीसाठी जुंपले जात आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी काय आहे हेही कोणाला माहीत नाही. जमा होणारा निधी कोणत्या खात्यात जाणार, त्याचा विनियोग कसा होणार, त्याचा हिशेब कोण देणार हे सर्व गुलदस्त्यात आहे. ही एक प्रकारे खंडणीखोरी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांची छायाचित्रे प्रवेशिकेवर छापून हा महोत्सव शासकीय असल्याचे भासवले जात आहे. या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. खोके घेऊन बसलेले शिंदे-फडणवीस सरकार आपल्याच मंत्र्यांना, कृषी खात्यातील खंडणीखोर अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्यास त्या विरोधात काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यचात आला.
