पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) विविध पदभरती परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ई-केवायसी प्रक्रिया २५ जुलैपासून सुरू केली होती. मात्र आता यात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. 

एमपीएससीच्या या पूर्वीच्या निर्णयानुसार कोणत्याही पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपली ओळख पडताळणी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा, उमेदवाराचा अर्ज स्वीकारता जाणार नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. ही केवायसी प्रक्रिया एकदाच पूर्ण करावी लागणार असून, उमेदवाराचे एकच प्रोफाइल सक्रिय राहून अन्य खाती निष्क्रिय मानली जातील. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि पात्र उमेदवारांना योग्य संधी मिळेल, असा एमपीएससीचा विश्वास आहे. उमेदवारांनी वेळेवर ही प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेच्या तयारीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही एमपीएससीने केले होते.

ई केवायसी प्रक्रियेत प्रत्येक उमेदवाराला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) करून आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर ओळखपत्राच्या आधारे केवायसी करावी लागणार आहे. केवायसी करण्यासाठी वापरला जाणारा मोबाइल क्रमांक हा आधार क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे, अन्यथा ओटीपी’ न मिळाल्यास ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर,एमपीएससीने नवीन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एमपीएससीच्या ऑनलाइन अर्जप्रणालीवरील उमेदवारांच्या खात्याच्या केवायसीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे. प्रशासकीय कारणास्तव ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एमपीएससीच्या या निर्णयामुळे आता उमेदवार संभ्रमात पडले आहेत. त्याबाबत समाजमाध्यमांत काहींनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहे. एमपीएससीचे काय चालले आहे हे काहीच समजत नाही, एमपीएससी स्वतःच गोंधळात असल्याचे दिसून येते, असे एका उमेदवाराने नमूद केले आहे.