पुणे : राज्याच्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे तर घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहे. या जोरदार पावसामुळे प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून अनेक ठिकाणी मदतकार्य सुरू आहे.
या एकूणच सध्याच्या परिस्थिती बाबत पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, दरवर्षी मान्सूनचे ८ जूनला आगमन होते. यंदा मात्र मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. केरळमध्ये देखील ८ जून अगोदरच आगमन झाले आहे. तर काल तळकोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे. आज मुंबईपर्यंत त्याचं आगमन झालं आहे. पुणे, सोलापूरमध्ये देखील मान्सून आज दाखल झाला आहे. मुंबईत आज अतिवृ्ष्टी होण्याची शक्यता असून पुढील चार दिवसांसाठी मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट तर पुणे शहराला येलो अलर्ट असणार असून पुढील पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल अशी शक्यता पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी व्यक्त केली आहे.