पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सोमवारपासून (१५ सप्टेंबर) सुरुवात करण्यात येणार आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबत माहिती दिली. नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज यूडायसमधील पेनआयडीद्वारे ऑनलाइन पद्धतीने शाळांमार्फत भरायचा आहे. तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे श्रेयांक हस्तांतरणाचे विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळांद्वारे भरण्यात येणार आहेत.
सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी शाळा खात्यातीव शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक या बाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून अंतिम केल्यानंतर अर्ज भरायच्या कालावधीत माध्यमिक शाळांच्या लॉग इन मधून उपलब्ध करुन दिलेल्या प्रिलिस्टची मुद्रित प्रत घेऊन विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेल्या सर्व माहितीची सर्वसाधारण नोंदवहीनुसार पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री करावी. माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. तसेच पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापकांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.