पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा बहुप्रतीक्षित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार राज्यातील पाचवीच्या १६ हजार ६९३, तर आठवीच्या १५ हजार ९३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून या परीक्षांकडे पाहिले जाते. यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली.
पाचवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ५ लाख ६६ हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ७८ हजार ९५ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यानंतर २५ एप्रिल रोजी परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या अंतरिम निकालानुसार पाचवीचा २३.९० टक्के, तर आठवीचा १९.३० टक्के निकाल लागला. त्यानंतर दोन महिने उलटूनही अंतिम निकाल जाहीर झाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे निकालाकडे लक्ष लागले होते.
या पार्श्वभूमीवर, बुधवारी रात्री उशीरा अंतिम निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. गुणपडताळणीसाठीचे अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला. या अंतिम निकालावरून शासनमान्य संचाच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. निकालामध्ये पाचवीचे १ लाख ३० हजार ८४६ विद्यार्थी पात्र ठरले, त्यापैकी १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तसेच आठवीचे ७० हजार ५७१ विद्यार्थी पात्र ठरले, त्यापैकी १५ हजार ९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या ऑनलाइन खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळेने त्याची रंगीत मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना वितरित करावी. गुणपत्रकाची डिजिटल प्रत देण्यात आलेली असल्याने छापील गुणपत्रक वितरित केले जाणार नाही.
केवळ शिष्यवृत्तीधारक आणि राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची रंगीत छापील प्रमाणपत्रे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत संबंधित शाळांना उपलब्ध करून दिली जातील. ऑनलाइन अर्जात चुकीची किंवा खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शाळा मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्हता रद्द केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.