पुणे : ‘महावितरण’च्या पुणे विभागातील लघुदाब वीज ग्राहकांकडे ४६ कोटी रुपयांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी सुमारे ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी ही माहिती दिली. ‘महावितरण’च्या पुणे विभागाची आढावा बैठक गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये मंगळवारी (६ मे) झाली. त्या वेळी मुख्य अभियंता काकडे बोलत होते. अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, ज्ञानदेव पडळकर, संजीव नेहेते या वेळी उपस्थित होते.
‘पुणे विभागातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांकडे गेल्या मार्चमध्ये ६९ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यांपैकी २२ कोटी ५४ लाख रुपयांच्या थकीत बिलांचा भरणा संबंधित ग्राहकांनी केला आहे. ४१ हजार ७९१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. उर्वरित ४६ कोटी ४६ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसह थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास आणखी वेग द्यावा,’ असे निर्देश काकडे यांनी या वेळी दिले.
‘पायाभूत वीजयंत्रणा अस्तित्वात आहे अशा ठिकाणी नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यात यावी, मालकी बदलल्यानंतर वीज देयकांमध्ये नाव बदलांचे, पत्ता बदल किंवा वीजभार वाढीचे अर्ज ग्राहकांकडून ऑनलाइन प्राप्त होतात. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, काही कागदपत्रांची कमतरता किंवा आवश्यकता असल्यास अर्ज नामंजूर करण्याआधी संबंधित ग्राहकांना तातडीने कळवून त्याची पूर्तता करावी, नवीन वीजजोडणी, देयकांच्या तक्रारींसह इतर सर्व सेवा ग्राहकसेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीमध्ये देण्यात याव्यात, त्यासाठी संबंधित विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांनी दैनंदिन पर्यवेक्षण करावे, याबरोबरच वीजवापर कमी दिसून येत आहे, अशा व्यावसायिक व औद्योगिक वीजजोडण्यांची तातडीने तपासणी करावी,’ अशा सूचना काकडे यांनी केल्या.
विजेच्या अधिक मागणीच्या कालावधीमध्ये अतिभारित होणाऱ्या वीजवाहिन्यांच्या विभाजनाच्या कामांचा काकडे यांनी आढावा घेतला. तसेच, उपस्थित संबंधित ‘एजन्सीं’च्या अधिकाऱ्यांना याबाबतची सर्व कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले.
वीजबिलांची थकबाकी वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग दिला जाणार आहे. नवीन वीजजोडण्या देण्यासह नाव बदलण्याच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सुनील काकडे, मुख्य अभियंता, पुणे विभाग