पुणे : वीजयंत्रणेत बिघाड झाल्याने हिंजवडी परिसरातील ‘आयटी’ कंपन्या आणि ५२ हजारांहून अधिक घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी खंडित झाला होता. वीज नसल्याने ‘आयटी’ उद्योगाला फटका बसला असून, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ‘टीसीएस’, ‘विप्रो’, ‘आयबीएम’, ‘टेक महिंद्रा’, ‘कॉग्निझंट’, ‘डीएलएफ’, ‘आयगेट पटाणी’ (कॅप इंडिया), ‘दाना इंडिया’, ‘डायनेस्टी’, ‘ॲसेंडास’ या कंपन्यांना प्रत्येकी पाच तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
‘महापारेषण’ कंपनीने नियोजित देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (६ जुलै) सकाळी ११ ते दुपारी एक या कालावधीत वीजपुरवठा बंद केला होता. मात्र, देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू करताना ‘इन्फोसिस ते पेगासस’ या अतिउच्चदाब भूमिगत वीजवाहिनीत दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोठा बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या हिंजवडी एमआयडीसी आणि आयटी पार्क परिसरातील ९१ उच्चदाब व सुमारे ५२ हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यात पिंपरी विभागातील २० हजार, तर मुळशी विभागातील ३२ हजार घरगुती, लघुदाब ग्राहकांना फटका बसला.
पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने सोमवारी पहाटे चारपर्यंत सर्व घरगुती ग्राहकांचा आणि काही उद्योगांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, ८५ उच्चदाब आणि २ अतिउच्चदाब उद्योगांची मागणी जास्त आहे. त्यासाठी इतर कोणत्याही उपकेंद्रावर वीजभार शिल्लक नसल्यामुळे वीजपुरवठा नाइलाजाने बंद ठेवावा लागणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग यांच्यासह महावितरणच्या जनमित्रांनी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले