पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शुक्रवारी (२० जून) शहरात होणार आहे. पालखी आगमनानिमित्त शुक्रवारी शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पालखी सोहळ्यात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. पालखी सोहळ्याचे आगमनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. शुक्रवारी सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता – फर्ग्युसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, नेहरू रस्त्यावरील रामाेशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, डाॅ. संदीप भाजीभाकरे, तसेच पोलीस निरीक्षक (वाहतूक नियोजन) सुनील गवळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी मुक्कामी रस्ते बंद

पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर नाना-भवानी पेठेतील रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. पालखी सोहळा रविवारी (२२ जून) सकाळी शहरातून प्रस्थान ठेवणार आहे. वारकरी बांधव श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, तसेच शनिवार वाडा परिसरात गर्दी करत असल्याने शुक्रवारी (२० जून) ते रविवारी (२२ जून) सकाळी अकरापर्यंत छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते बेलबाग चौक) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यांयी मार्गांचा वापर करावा.

दृष्टीक्षेपात पालखी सोहळा बंदाेबस्त

  • शहरात साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
  • गर्दीचे नियंत्रण, नियोजनावर लक्ष केंद्रीत
  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पालखी सोहळ्यावर नजर
  • दिंडीतील वाहनांना पुढे पाठविणार
  • भाविक, वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
  • वाहतूक बदलांची माहिती https://diversion.punepolice.gov.in/ लिंकवर
  • शहरातील प्रमुख २६ रस्ते वाहतुकीस बंद
  • चोरी, गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र बंदोबस्त
  • भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धक यंत्रणा