बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुमारे ८८.४८ टक्के मतदान झाले असून, ब वर्गासाठी ९९ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे मंगळवारी (२४ जून) होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
या निवडणुकीत २१ जागांसाठी ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी ६७ केंद्रे होती. निवडणुकीसाठी १९ हजार ५४९ मतदार असून त्यापैकी १४ हजार ५८८ पुरुष तर ४ हजार ९६१ महिला मतदार आहेत. त्यापैकी १२ हजार ८४३ पुरूष आणि ४ हजार ४३४ महिला मतदारांनी मतदान केले. १९ हजार ५४९ मतदारांपैकी १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी रविवारी सकाळी मतदान केले. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी गर्दी होती. दुपारी मतदानाचे प्रमाण कमी होते. दुपारी चारनंतर पुन्हा मतदानासाठी मतदार बाहेर पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १६ हजार ५२३ मतदारांनी मतदान केले होते. शेवटच्या एका तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने मतदानाचे प्रमाण वाढले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात चौरंगी लढत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पॅनेलही उतरले. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. त्यामुळे अजित पवार आणि युगेंद्र पवार हे काका-पुतणे विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा समोरासमोर आले. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.या कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराच्या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामतीतील शाखा रात्री सुरू ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे मतदारांनी कोणाच्या बाजूने कल दिला आहे, हे २४ जून रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
‘ब’ गटात ९९ टक्के मतदान
या कारखान्याच्या निवडणुकीसाठी सात गट होते. गट १- माळेगावसाठी ११ मतदान केंद्रे, गट २ -पणदरेसाठी १३, गट ३ सांगवी-कांबळेश्वरसाठी ८, गट ४ – खांडज-शिरवलीसाठी ७, गट ५ – नीरा-वागजसाठी १२, गट ६ – बारामतीसाठी १५ मतदान केंद्रे होती. तसेच ‘ब’ वर्गासाठी एका केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘ब’ गटातून उभे असून, त्यांनी अध्यक्षपदासाठी स्वत:चे नाव घोषित केले. त्यामुळे या निवडणुकीला रंगत आली. या गटात १०२ मतदार होते. त्यापैकी १०१ मतदारांनी मतदान केले.
गेली ३४ वर्षे काम करत आहे. लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निवडण्याचा मतदारांना अधिकार आहे. कारखान्याचा कोण विकास करणार, हे मतदार ठरवतील. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती शाखा रात्री सुरू असताना आमच्या पॅनेलचा एकही सदस्य उपस्थित नव्हता.अजित पवार, उपमुख्यमंत्री
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या निवडणुकीत पैशांचा वापर करण्यात आला. गेली ४० वर्षे आम्ही काम करत आहोत. लोकांचा कल आम्हाला जाणवत आहे. पैशांपेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे.चंद्रराव तावरे, सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख