लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मंचरमधील एका डॉक्टरचे अपहरण करून खंढणी उकळणाऱ्या सराइताला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय ३२, रा. वाळद, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डॉक्टरने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार डॉक्टर ४ जानेवारी रोजी पेठ ते मंचर या मार्गावरुन दुचाकीवरुन निघाले होते. मोटारचालक आरोपी पवन सुधीर थोरात (रा. मंचर, जि. पुणे) आणि ओव्हाळ त्यांच्या मागावर होते. दुचाकीस्वार डॉक्टरला मोटारीने धडक दिल्याने ते रस्त्यात पडले. त्यानंतर त्यांचे अपहरण करुन निघोटवाडी परिसरात नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण करुन २० लाख रुपयांची खंडणी मागितली. डॉक्टरांना धमकावून त्यांनी पिस्तुलातून एक गोळी झाडली, तसेच त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर पेठ घाटात डॉक्टरला सोडून आरोपी थोरात आणि ओव्हाळ मोटारीतून पसार झाला.

याप्रकरणी डॉक्टरांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोपी ओव्हाळ आणि थोरात सराइत असून, त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पसार झालेला आरोपी थोरात याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेला ओव्हाळ पसार झाला होता. गेले दोन महिने पोलीस ओव्हाळच्या मागावर होते. पसार झालेला ओव्हाळ आळेफाटा एसटी स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अक्षय नवले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ओव्हाळला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस कर्मचारी दीपक साबळे, अक्षय नवले, संदीप वारे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी ही कामगिरी केली. याप्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपी ओव्हाळ याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.