पुणे: पादचारी महिलेला अडवून भर चौकात तिचा विनयभंग केल्याची घटना विश्रांतवाडीतील कळस भागात घडली. याप्रकरणी सराइतासह तिघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सराइत गुन्हेगार संकेत सावंत (रा. कळस, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विश्रांतवाडीत राहायला आहेत. ती आळंदी रस्त्यावर कळस येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे निघाली होती.

त्या वेळी दुचाकीवर बसलेल्या तरुणांनी महिलेची छेड काढली. त्या वेळी सराइत गु्न्हेगार संकेत सावंत तेथे होता. ‘ मी या भागातला दादा आहे. तू खूप सुंदर दिसते’, असे म्हणून तिचा विनयभंग केला. सावंत याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी अश्लील शब्दात महिलेशी संवाद साधला.

या घटनेनंतर महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सराइत गुन्हेगार संकेत सावंत याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर, तसेच उपनगरात टवाळखोरांकडून महिला, तरुणींची छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तरुणींचा पाठलाग करुन त्यांची छेड काढली जाते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी सडक सख्याहरींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.