व्यवस्थेला प्रश्न विचारणे साहित्यिकाचे काम

पुणे : माणसाला विचारप्रवण आणि निर्भय बनविणे हेच साहित्याचे उद्दिष्ट असले पाहिजे. माणूस निर्भय होणार नसेल तर साहित्यनिर्मितीचे प्रयोजनच काय? असा सवाल ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी गुरुवारी उपस्थित केला. प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणे हेच साहित्यकाराचे काम असते, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाजपेयी यांच्या हस्ते वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी वाजपेयी बोलत होते. वाजपेयी म्हणाले, माणसाला विचारप्रवण करण्याची क्षमता साहित्यामध्ये असते. पण, सध्या विचार करण्याची प्रक्रिया आम्ही दुसऱ्यांवर सोपविली आहे. रथ या सुंदर शब्दाला राम हा शब्द जोडून आम्ही राजकारण सुरू केले. स्वातंत्र्य संग्रामातील गांधीजींचे योगदान विसरले तरी चालेल. पण, मुघलांनी किती मंदिरे तोडली हे लक्षात ठेवा. विस्मृती वाढविण्याचे अभियान राबविले जात आहे. प्रश्नवाचकता हा साहित्याचा गुणधर्म असतो. महाभारत हे महाकाव्य धर्मयुद्धावर प्रश्न उपस्थित करते. या परंपरेचे पाईक असलेल्या साहित्यकाराने प्रस्थापित व्यावस्थेविरुद्ध प्रश्न उपस्थित केले पाहिजेत.

भाषा वाचविण्याची जबाबदारी..

आज साऱ्या भारतीय भाषा संकटात आहेत. भाषा टिकविणारा मध्यमवर्ग मातृभाषेचा विश्वासघात करून आपल्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमामध्ये प्रवेशाचा आग्रह धरत आहे. त्यामुळे मातृभाषेचे पुनर्वसन करण्याची जबाबादारी आता साहित्यावर आहे, असेही वाजपेयी म्हणाले.

आपला सार्वजनिक संवाद अभद्र झाला आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील राजकीय कार्यक्रम पाहिल्यानंतर आपण भाषेचा सौम्यपणा आणि ऋजुता हरवून बसलो आहोत, याची प्रचिती येते. प्रस्थापितांविरोधातील ही लढाई जिंकू शकणार नाही. अशा विफल लढाईचे साहित्यकार हेच वाहक असतात. विफल माणसेच इतिहास घडवतात. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अशोक वाजपेयी