मराठा क्रांती ठोक मोर्चाने शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिवाय, आज शिवसैनिकांकडून तानजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्यानंतर, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन फुले देखील वाहिली आहेत.

शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पाच दिवसांपासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे अशी मागणी केलेली आहे. यामुळे शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी फोडले. या घटनेनंतर मराठा क्रांती ठोक मोर्चातील कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांना समर्थन देत, या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक महेश डोंगरे म्हणाले की, “तानाजी सावंत यांच्या साखर कारखान्याच्या ऑफिसवर आज जो भ्याड हल्ला झाला. त्या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो. एवढी घटना होऊन देखील तानाजी सावंत यांनी शांततेत राहण्याच आवाहन केले आहे. पण येणार्‍या काळात तुम्ही तारीख, वार आणि वेळ सांगा, आम्ही देखील जशाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत.” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.