चित्रपट, नाटक, साहित्य अशा विविध माध्यमांमधून आपण समृद्ध होत असतो. माध्यमे आणि माहितीच्या जंजाळात ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट या नव्या क्षेत्रात स्नॉवेलने सहा वर्षांपूर्वी पाऊल टाकले आणि विविध विषयांवरील कथा, कादंबऱ्यांपासून ते अगदी चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचेही काम स्नॉवेलने केले. स्नॉवेलने मराठी आणि अन्य जागतिक भाषांमधील साहित्य ध्वनी-माध्यम संकलन संस्कार, कलाकारांच्या आवाजाची निवड, पाश्र्वसंगीत अशा पैलूंसह ऑडिओ बुकच्या स्वरुपात आणले आहे. कंपनीच्या ऑडिओ बुक आणि पॉडकास्ट नामक श्राव्य सफरीचा आनंद काही वेगळाच आहे.

ऑडिओ बुक्स ही संकल्पना असलेले क्षेत्र अद्याप पुण्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात कुठेही इंडस्ट्री अशा स्वरुपात नावारुपाला आलेले नाही. ध्वनी किंवा श्राव्य क्षेत्रातील ऑडिओ बुक आणि पॉडकास्ट ही दोन उत्पादने आहेत. रेडिओ हे देखील त्यातलेच. परंतु, सध्या चित्रपट संगीतासाठीच ते प्रामुख्याने वापरले जाते. ऑडिओ बुक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे सलग वाचन,तर पॉडकास्ट म्हणजे ‘ऑन डिमांड ऑडिओ’. विविध विषयांवरच्या कथा, कादंबऱ्या, कविता यापासून अगदी वृत्तपत्रांमधील विशेष पुरवण्यांमधील मजकूर श्राव्य स्वरुपात मागणीनुसार उपलब्ध होऊ शकेल, अशा प्रकाराला पॉडकास्ट म्हणतात. सध्या पाश्चिमात्य देशातील ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. श्राव्य स्वरुपातील साहित्य उपलब्ध करुन देणाऱ्या आणि त्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या परदेशात आहेत. तसेच सर्वमान्यांच्या उपलब्धीसाठी विविध प्रकारची संकेतस्थळे आणि मोबाईल अ‍ॅप्स दिमतीला आहेत. ही बाजारपेठ अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये अत्यंत परिपक्व आणि प्रस्थापित आहे. आपल्याकडे ऑडिओ बुक तयार करणाऱ्या आणि ते उपलब्ध करुन देणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्या नाहीत.

या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे जे सर्वोत्तम साहित्य निर्माण झाले आहे, त्याचा श्राव्य स्वरुपातील आस्वाद चोखंदळ रसिकांना देण्यासाठी आणि एक स्वतंत्र कलाप्रकार तयार करण्याची इच्छा असल्याने समीर धामणगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०११ मध्ये स्नॉवेल कंपनीची स्थापना पुण्यात केली. प्रामुख्याने ऑडिओ बुक, पॉडकास्ट तयार करण्याचे काम कंपनीकडून केले जाते. अर्थातच ऑडिओ बुकची सुरुवात त्यांनी मराठीतून केली आहे. सुरुवातीला ऑडिओ बुक, पॉडकास्ट याबाबत लोक पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यामुळे हा प्रकार समजून सांगण्यासाठीच समीर यांचा वेळ गेला. समाजमाध्यमे, इंटरनेट वापरामुळे आता लोकांना ऑडिओ बुक, पॉडकास्ट यांची तोंडओळख झाली. तसेच अनेकांना कंपनीने तयार केलेले नमुने ऐकवल्यानंतर त्यांच्याकडून मागणी येऊ लागली.

मराठी माणसाला काय ऐकायला आवडेल, अशा पद्धतीने ऑडिओ बुक तयार करताना कंपनीने विषय हाताळायला सुरुवात केली. संबंधित कथा, कादंबरीत एक पात्र असल्यास एक आणि एकापेक्षा अधिक पात्र असल्यास तेवढे आवाज ऑडिओ बुकमध्ये वापरले जातात आणि हा सर्व प्रकल्प एक दिग्दर्शक चालवतो. चित्रपट किंवा नाटकासारखे त्याला हाताळण्यात येते. तसेच प्रसंग ऐकणाऱ्याच्या तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहण्यासाठी गरज असेल तेथे संगीत वापरले जाते, संगीत रचना केल्या जातात. ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणारा आनंद मिळावा, अशा पद्धतीने त्याची निर्मिती होते. या सर्व गोष्टी समोर ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली.

समीर यांच्याबरोबर नाटय़क्षेत्राची आवड असणारे अनिरुद्ध जोशी, अंजली कुलकर्णी, वास्तुविशारद पराग केंद्रेकर असे चार जण कार्यरत आहेत. अनिरुद्ध आणि अंजली यांना वर्ल्ड स्पेस रेडिओमधील कामाचा अनुभव आहे. कंपनीच्या सुरुवातीला वैभव कुलकर्णी यांचाही सहभाग होता. परंतु, त्यांची पत्नी लष्करात कार्यरत असल्याने सध्या ते डेहराडून, पठाणकोट येथे आहेत. त्यामुळे वैभव यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी सल्लागार म्हणून ते भूमिका बजावतात. त्याव्यतिरिक्त अन्य काही जणांना प्रकल्पानुरुप सहभागी करुन घेण्यासाठी एक कोअर टीम आहे. कंपनीचे पुणे मुंबई येथे काम चालते.

प्रभाकर पेंढारकरांची गाजलेली कादंबरी ‘रारंगढांग’, डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘प्रेषित’, जयवंत दळवी लिखित ‘सारे प्रवासी घडीचे’ पुस्तक, प्रकाश संत यांचे वनवास, जीम कार्बेट यांच्या ‘कुमाउंचे नरभक्षक’ या शिकारी कथा हे सर्व साहित्य कंपनीने ऑडिओ बुक स्वरुपात केले आहे. मुक्ता चैतन्य या लेखिकेची सोशल मीडियावर तेरा भागांची मालिका आणि द्वारकानाथ संझगिरी यांचे काही लेख पॉडकास्टमध्ये केले आहेत. सध्या सत्यजित राय यांच्या कथांवर काम सुरु असून त्यामधील तीन कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘मुरांबा’ नावाचा मराठी चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला. चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी पॉडकास्ट या प्रकारात चित्रपटातील प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील अगदी दोन-तीन मिनिटांचे संवाद खुशखुशीत पद्धतीने केले होते. हा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच करण्यात आला. असे विविध प्रयोग कंपनीने केले आहेत.

२०११ पासून आतापर्यंत कंपनीने स्वत:ची अशी सत्तर उत्पादने केली आहेत. तर, चालू वर्षांत स्वत:चा पॉडकास्टही सुरु केला आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून दिलीप प्रभावळकर, सचिन खेडकर, उमेश कामत, संदीप बर्वे, सुबोध भावे, अमेय वाघ, सतीश आळेकर, इला भाटे अशा सव्वाशेपेक्षा जास्त कलाकारांनी कंपनीबरोबर काम केले आहे. तर, विशेष प्रकल्पांसाठी दिग्दर्शक म्हणून निपुण धर्माधिकारी, नचिकेत देवस्थळी, ऋचा आपटे, शार्दुल सराफ, अक्षय वैद्य अशा मंडळींनी कामे केली आहेत. कंपनीचे स्वत:चे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप आणि संकेतस्थळही आहे.

‘या क्षेत्रात तांत्रिक आणि खास ऑडिओ बुक करण्यासाठी लिखाण करणारे खूप कमी आहेत. दीर्घकालीन दृष्टीकोन समोर ठेवून या क्षेत्राबाबत फारसे प्रयत्न देशासह राज्यात झालेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ऑडिओ बुक आणि पॉडकास्टमध्ये विविध प्रकारचे विषय आणायचे आहेत. काही युरोपियन ऑडिओ बुक कंपन्या आणि अ‍ॅमेझॉनची या क्षेत्रातील ऑडिबल नावाची बडी कंपनी भारतात पुढील वर्षी येत आहे. अशाप्रकारे या संकल्पनेला उत्तेजन देणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अन्य भाषांमधील साहित्याचे काम सुरु असून आगामी काळात ते मोठय़ा प्रमाणावर करण्यात येणार आहे’, असे समीर सांगतात.

अभिवाचन नावाच्या कलाप्रकाराचे कौशल्य संपादित केले पाहिजे, त्याकरिता नैसर्गिक आवाज असल्यास उत्तम. याव्यतिरिक्त चौफेर वाचन, वाचनाचे व्याकरण या गोष्टी आत्मसात केल्यास या क्षेत्रात खूप काही करण्यासारखे आहे. ऑडिओ बुक प्रकारात सलग वाचन करायचे असल्याने लेखकाला नेमकेपणाने काय म्हणायचे आहे हे समजून घ्यावे लागते, असेही समीर सांगतात. विविध प्रकारच्या साहित्याचा वेगळा आणि निखळ आनंद घेण्यासाठी हा कलाप्रकार अनुभायला हवा.