पुणे : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा विद्यापीठासाठी दीड वर्षानंतर संविधानिक, शिक्षक, शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यानुसार एकूण ३८ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. मंजूर केलेल्या पदांपैकी ११ संविधानिक पदांमध्ये कुलगुरू, कुलसचिव, चार अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, ज्ञानस्रोत केंद्र संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ संचालक, विद्यार्थी विकास संचालक, वित्त व लेखा अधिकारी यांचा समावेश आहे.
१४ शिक्षकीय पदांमध्ये दोन प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक, आठ सहायक प्राध्यापक आहेत; तर १३ शिक्षकेतर पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये उपकुलसचिव, दोन सहायक कुलसचिव, दोन स्वीय सहायक, कार्यालय अधीक्षक, दोन संशोधन सहायक, सहायक ग्रंथपाल, चार लिपिक व टंकलेखक या पदांचा समावेश आहे.
विद्यापीठात पाच अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यात पदवी स्तरावर मराठी लिपीशास्त्र, नाट्यशास्त्र, पदव्युत्तर स्तरावर अभिजात भाषा, समाजभाषा विज्ञान आणि बोली विज्ञान, मानसशास्त्र या अभ्यासक्रमांचे अध्यापन अभ्यागत प्राध्यापकांद्वारे सुरू करण्यात आले आहे. पहिल्या वर्षी ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता शासनाने पदांना मंजुरी दिली आहे. येत्या काळात भरती प्रक्रिया होईल.- डॉ. अविनाश आवलगावकर, कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ