Savitribai Phule Pune University / पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांतून शिक्षणावर भर देण्यात आला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे क्वांटम कम्प्युटिंग या विषयावरील मराठी भाषेतील पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. क्वाटंम कम्प्युटिंग क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत, संशोधन करत असलेले प्रा. प्रमोद जोग यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, क्वांटम कम्प्युटिंग या विषयावरील शास्त्रीय स्वरूपाचे पुस्तक मराठीतून पहिल्यांदाच उपलब्ध होणार आहे.
प्रा. जोग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात ३३ वर्षे अध्यापन करून निवृत्त झाले आहेत. क्वांटम कम्प्युटिंग या विषयावर त्यांचे अनेक शोधनिबंध, लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी.ही प्राप्त केली आहे.
क्वांटम कम्प्युटिंगसारख्या विषयावर मराठीत शास्त्रीय माहिती उपलब्ध नसल्याने त्यांनी पुस्तकाचे लेखन करण्याचा निर्णय घेतला. सध्या क्वांटम कम्प्युटिंग या विषयावर जगभरात मोठ्या प्रमाणात संशोधन होत असताना मराठीत उपलब्ध होणारे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकणार आहे.
पुस्तकाविषयी माहिती देताना प्रा. जोग म्हणाले, अनेक वर्षे बंगाली, तमीळ, केरळी लोकांबरोबर काम केले. विज्ञानाच्या प्रचारप्रसारात ते पुढे असल्याचे जाणवले. शाळा, महाविद्यालयांत व्याख्यान देण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे काम त्यांच्याकडून होते. त्या तुलनेत मराठीत असे वातावरण दिसून आले नाही. त्यामुळे मराठीत शास्त्रीय पद्धतीने पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून काम करत आहे. आतापर्यंत दोन पुस्तके इंग्रजीत प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे आता क्वांटम कम्प्युटिंगवर मराठीत पुस्तक लिहिण्याचा विचार केला.
मराठीत वैज्ञानिक परिभाषा अद्याप परिपूर्ण नाही. त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने मराठीत, इंग्रजी संकल्पनांचा वापर करून क्वांटम कम्प्युटिंग या विषयाची सविस्तर मांडणी केली आहे. प्रामुख्याने गणितीय आणि सैद्धांतिक संकल्पना टाळून या विषयाच्या मूळ गाभ्यातील संकल्पना समजावण्यावर भर दिला आहे.
त्यातून क्वांटम कम्प्युटिंग या क्षेत्राची माहिती समजू शकेल. या विषयावर इंग्रजीत खूप पुस्तके असली, तरी शास्त्रीय पद्धतीचे पुस्तक मराठीत पाहण्यात आलेले नाही. बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. त्यामुळे विज्ञान, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ग्रंथालयात हे पुस्तक असणे महत्त्वाचे आहे, असे प्रा. जोग यांनी सांगितले.
इंग्रजीतही भाषांतर
पहिल्यांदा मराठीत पुस्तक लिहिल्यानंतर त्याचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी चॅटजीपीटीचे साहाय्य घेण्यात आल्याचे प्रा. जोग यांनी सांगितले.
प्रा. प्रमोद जोग यांनी क्वांटम कम्प्युटिंग विषयावर मराठीत पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे करण्यात येणार आहे. या विषयावर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचेही नियोजन आहे. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू.