आत्मचरित्र आणि चरित्रपर पुस्तकांनी मराठी वाङ्मयाचे दालन समृद्ध केले आहे. दीर्घ काळ उपलब्ध नसलेल्या मराठी साहित्यातील महत्त्वाच्या चार आत्मकथनांची अर्धशतकानंतर वाचकांना पुनर्भेट घडली आहे. ‘साधना प्रकाशना’ने हा योग जुळवून आणला आहे.
‘जुन्या काळातील माणसांची जडणघडण कशी झाली होती, याचे विवेचन करणारी, त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती कशी होती याचे आकलन नव्या पिढीच्या वाचकांना होण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची अशी ही आत्मकथने आहेत. त्यामुळे पुस्तकांना मागणी कितपत असेल हा व्यवहार्य विचार न करता हे नव्या पिढीतील वाचकांच्या हाती द्यायला हवे या उद्देशातून ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत,’ अशी भूमिका ‘साधना साप्ताहिका’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी मांडली.
‘हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील आठवणी’ या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मूळ तेलुगू भाषेतील आत्मकथनाचा वि. पा. देऊळगावकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री पदावर देदीप्यमान कामगिरी केलेले चिंतामणराव देशमुख यांचे ‘द कोर्स ऑफ माय लाइफ’ हे आत्मकथन १९७६ मध्ये प्रकाशित झाले होते. ‘माझा जीवनप्रवास’ या नावाने वि. वा. पत्की यांनी केलेला अनुवाद त्याच काळात आला होता. त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
पोर्तुगीज राजवटीखालील गोव्यात जन्माला आलेले धर्मानंद कोसंबी यांनी पाली आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तीन वर्षे श्रीलंकेत आणि दोन वर्षे म्यानमारमध्ये वास्तव्य केले. नंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात दोन वर्षे अध्यापन केले. अखेरच्या काळात ते सेवाग्राम आश्रमात राहिले. कोसंबी यांचे दीडशेवे जयंतीवर्ष ९ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, हे औचित्य साधून ‘निवेदन’ या त्यांच्या आत्मकथनाची नवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, केंद्रीय मंत्री आणि अमेरिकेत भारताचे राजदूत अशा पदांवर काम केलेले न्या. एम. सी. छगला यांचे ‘रोझेस इन डिसेंबर’ हे इंग्रजीतील आत्मकथन आणि ‘शिशिरातील गुलाब’ हा वि. वा. पत्की यांनी केलेला मराठी अनुवाद १९७६ मध्ये प्रकाशित झाला होता. न्या. छगला यांचे सव्वाशेवे जयंती वर्ष संपत असताना मराठी अनुवाद वाचकांच्या हाती सुपूर्द करण्यात आला आहे.
‘पॅपिलॉन’चा सुवर्णमहोत्सव
बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १९७५ पासून बऱ्याच इंग्रजी ललित पुस्तकांचे मराठी अनुवाद होऊ लागले. अनेक अनुवादित पुस्तके खूप गाजली, त्यांच्या आवृत्त्या निघाल्या. त्या सर्वांत विशेष भाग्य लाभले ते ‘पॅपिलॉन’ या आत्मकथेला. गेली ५० वर्षे हे पुस्तक ‘बेस्ट सेलर’ ठरले आहे. ‘पॅपिलॉन’ ही एका कैद्याची सत्यकथा आहे. न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. तुरुंगातून पळून जाण्याचा तो निर्धार करतो. आठ अयशस्वी प्रयत्नांनंतर नवव्या खेपेला तो अखेर यशस्वी होतो. ही अत्यंत रोमांचकारी कहाणी आहे.
रवींद्र गुर्जर यांनी या पुस्तकाचा केलेला अनुवाद मराठी वाचकांच्या पसंतीस उतरला. गुर्जर यांचे हे पहिलेच पुस्तक. साप्ताहिक ‘माणूस’मधून ते क्रमश: प्रसिद्ध झाल्यानंतर ५ ऑक्टोबर १९७५ रोजी त्याची पहिली आवृत्ती आळंदीला माउलींच्या समाधी मंदिरात प्रकाशित झाली. त्याला इतकी लोकप्रियता लाभली, की अनुवाद हेच रवींद्र गुर्जरांचे क्षेत्र बनले. त्यानंतर आजमितीला त्यांची ४० अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली असून, आठ-दहा पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सातारा येथे झालेल्या लेखक प्रकाशक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वयाच्या ८० व्या वर्षी ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत.
‘पॅपिलॉन’च्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून पुणे मराठी ग्रंथालय आणि ग्रंथसखा वाचनालय, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (४ ऑक्टोबर) पुणे मराठी ग्रंथालयाच्या केशव सभागृहात दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गुर्जर यांचा विशेष सत्कार होणार आहे. ‘पॅपिलॉन’ची पहिली आवृत्ती प्रकाशित करणाऱ्या राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर आणि पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
vidyadhar.kulkarni@expressindia.com