पुणे : यंदाचा मार्च महिना १७५ वर्षांच्या हवामानाच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण मार्च ठरला आहे. जगभरात मार्च महिन्यात जमीन आणि समुद्रावरील तापमान सरासरीपेक्षा १.३५ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले आहे.

अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने (नोआ) दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा मार्च महिना १७५ वर्षांच्या हवामानविषयक नोंदीच्या इतिहासातील सर्वांत उष्ण मार्च माहिना ठरला आहे. मार्च महिन्यांत जगाचे सरासरी तापमान १२.७ अंश सेल्सिअस असते, त्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये १.३५ अंश सेल्सिअस इतक्या जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा…निम्म्या पुण्याचा पारा चाळीशी पार, जाणून घ्या कुठे, किती तापमान…

मार्चमधील तापमानाने गेल्या दहा महिन्यांतील उच्चांक गाठला. मार्चमध्ये आफ्रिका, दक्षिण अमेरिकेत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले, त्या तुलनेत युरोपात तापमान वाढ कमी होती. उत्तर अमेरिका, मध्य आशिया, उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले.
मार्चमध्ये पृथ्वीवरील बर्फाचे आच्छादनही कमी दिसून आले. हवामानविषयक नोंदीनुसार यंदा आठव्या क्रमांकाचे सर्वांत कमी बर्फाच्छादन होते. युरोप आणि अमेरिकेतील बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी दिसून आला. तसेच समुद्रातील बर्फाचे प्रमाणही कमी होते. आर्क्टिक समुद्रातील बर्फाचा विस्तार सरासरीपेक्षा ६० लाख चौरस किमीने कमी होता. अंटार्क्टिकावरील बर्फाचा विस्तार खूपच कमी म्हणजे ३ लाख ५० हजार चौरस किमीने कमी दिसून आला.

हेही वाचा…सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल… म्हणाल्या, ‘जितका मोठा भ्रष्टाचारी, तितका मोठा त्याचा भाजपमध्ये प्रवेश’

भारतातही सरासरीपेक्षा कमी तापमान

यंदा मार्चमध्ये दक्षिण भारतातील तापमान सरासरीपेक्षा जास्त होते, त्या तुलनेत उत्तर भारतातील तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले. हिमालयात सातत्याने थंड हवेचे पश्चिमी वाऱ्याचे झंझावात सक्रिय राहिल्यामुळे उत्तर भारतात तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदविले गेले आहे. जगाचा विचार करता, वायव्य ऑस्ट्रेलियाला नेव्हिल, हिंदी महासागरात फिलिपो आणि उत्तर ऑस्ट्रेलियाला मेगन, या चक्रीवादळांचा तडाखा बसला.