पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्ग परिसरातील जांभुळवाडी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बारा दुचाकींसह मोटार जळून भस्मसात झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण अद्याप समजू शकलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जांभुळवाडीतील दरी पूलाजवळ साईप्रसाद सोसायटी आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास सोसायटीतील तळमजल्यावर अचानक आग लागली. आग भडकल्याने मोटार तसेच शेजारी लावण्यात आलेल्या बारा दुचाकींनी पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. पण सोसायटीचे प्रवेशद्वार अरुंद असल्याने बंब आत जाऊ शकत नव्हता. त्यामुळे सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारातून बंब आत गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलातील अधिकारी सुभाष जाधव आणि जवानांनी पाण्याचा मारा करून पाऊण तासात ही आग आटोक्यात आणली. मोटार पेटल्याने शेजारी असलेल्या दुचाकींना आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली. मोटारीतील बॅटरी तापल्याने आग लागली असावी, अशी शक्यताही अग्निशमन दलाकडून वर्तवली आहे.