खबरबात – शिवसेना, पिंपरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळ लोकसभेत उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेतून रागारागाने बाहेर पडलेले गजानन बाबर पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले. औटघटकेच्या वास्तव्यानंतर मनसेतून माघारी फिरले. भाजपमधून बोलावणे आले. तेव्हा शिवसेनेत परत येऊ की भाजपमध्ये जाऊ, अशा विवंचनेत अडकले. सरतेशेवटी त्यांनी शिवसेनेत राहण्याचा निर्धार केला. मात्र, तेथील दारे बंद झाली. आजमितीला शिवसेना किंवा भाजप, असा कुठून तरी निरोप येईल, या प्रतीक्षेत बाबर आहेत. त्यांचा ओढा शिवसेनेकडेच आहे. मात्र, ‘मातोश्री’चे दरवाजे अजून तरी त्यांच्यासाठी उघडलेले नाहीत.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एके काळी केंद्रस्थानी असलेले गजानन बाबर हे नाव. पिंपरी पालिकेचे तीन वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेता, दोन वेळा आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, मावळ लोकसभेचे पहिला खासदार आणि सातारच्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशी भली मोठी राजकीय कारकीर्द असलेले बाबर सद्य:स्थितीत सक्रिय राजकारणात नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन शिवसेनेत दाखल झालेल्या बाबरांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेची पहिली शाखा काळभोरनगर येथे सुरू झाली. काळभोरांच्या प्रभावक्षेत्रात बाबरांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. काळभोरांच्या अंतर्गत वादाचा फायदा घेत ते निवडून येत. हाच ‘फॉम्र्युला’ त्यांना राजकारणात कायम उपयोगात आला.

सन १९९५ मध्ये रामकृष्ण मोरे आणि ज्ञानेश्वर लांडगे यांच्या वादात ते हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. सन १९९९ मध्ये आझम पानसरे आणि हनुमंत गावडे यांच्यातील मतविभागणीचा फायदा झाल्याने बाबर पुन्हा निवडून आले. सलग दहा वर्षांच्या आमदारकीची सद्दी सन २००४ मध्ये विलास लांडे यांनी मोडून काढली. त्यानंतरच्या काळात बाबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत राहिले. त्याचा फायदा होऊन मावळ लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली. राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांचा पराभव करून ते खासदारही झाले. बाळासाहेबांच्या शिवसेनेने किराणा दुकानात काम करणारा एक सामान्य माणूस खासदार केला, त्याचे बरेच कौतुक झाले.

पाच वर्षांनंतर पुन्हा लोकसभा निवडणुका आल्या, तेव्हा पुलाखालून बरेच पाणी गेले होते. शिवसेनेने बाबरांना उमेदवारी न देता श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी देण्याचा शब्द देऊनही पत्ता कापण्यात आल्याने संतापलेल्या बाबरांनी बराच थयथयाट केला आणि शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. ते राज ठाकरे यांच्या मनसेत दाखल झाले. ज्या वेगाने ते मनसेत गेले, त्याच वेगाने परतही फिरले. भाजपमधून बोलावणे होते. मात्र, त्यांना शिवसेनेत परतायचे होते. त्यासाठी बाबरांनी अनेकांचे उंबरे झिजवले, विनवण्या केल्या. मात्र, ‘मातोश्री’ची नाराजी होईल, या धास्तीने कोणीही मध्यस्थी केली नाही. दोन वर्षांपासून शिवसेनेत परत येण्याचे प्रयत्न करून बाबर थकले.

बाबर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले आझम पानसरे ‘पवार प्रेम’ बाजूला ठेवून भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले.

आता बाबरांना भाजपकडून पुन्हा निरोप सुरू झाले. मात्र, त्यांचे ठाकरे प्रेम कायम आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बाबरांची लोकप्रियता ‘कॅश’ करून घेण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. मात्र, अधिकृत निरोप येईपर्यंत बाबरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महापालिकेत शिवसेना

*  २००७ :  ५ नगरसेवक

*  २०१२ :  १५ नगरसेवक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matoshree door still not open for gajanan babar
First published on: 11-01-2017 at 03:25 IST