महापालिकेच्या सभेत गोंधळ घालून अरेरावी करणे, मानदंड पळवून नेणे असे प्रकार करून सभागृहाची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या नगरसेवकांना निलंबित करण्याचे अधिकार सभापतींना द्यावेत, तसेच निलंबनाचा कालावधी दोन महिने करावा, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सभापतींच्या अधिकारात दुरुस्ती करण्याचीही मागणी महापौरांनी केली आहे.
महापालिका सभेत गेल्या आठवडय़ात मोठा गोंधळ झाला आणि सभेतून मानदंड पळवून नेण्याचाही प्रकार झाला. असेच प्रकार सभेत सातत्याने घडत असून सभेचे कामकाज सातत्याने विस्कळीत होते. सर्वसाधारण सभेत चांगले कामकाज करण्याऐवजी गोंधळ घालणे, अरेरावी करणे, महापौरांना व इतरांना अपशब्द वापरणे, नगरसचिव व इतर अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, नगरसचिवांवर धावून जाणे, कागदपत्रे हिसकावणे, फाडणे असे प्रकार सर्रास होत आहेत. सभेत लोकशाही मार्गाने आंदोलने झाली, तर त्याबाबत आक्षेप नाही. मात्र, त्याऐवजी गोंधळ घालण्याचेच प्रकार सातत्याने होत आहेत, असे महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राधिकाऱ्याने सभेत सुव्यवस्था राखली पाहिजे असे कायदा सांगतो. सभेत जे सदस्य अत्यंत गैरशिस्तीचे वर्तन करत असतील त्यांना सभेतून तातडतोब बाहेर जाण्याचा आदेश सभापती (महापौर) देऊ शकतात. तसेच त्यानंतर सदस्याने ताबडतोब बाहेर गेले पाहिजे व त्या दिवशीच्या सभेत अनुपस्थित राहिले पाहिजे, अशीही तरतूद कायद्यात आहे. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर ते बाहेर गेले नाहीत तर सभापतीने काय करावे याची कोणतीही तरतूद किंवा उपाययोजना कायद्यात नाही. त्यामुळे संबंधित कायद्यातील नियम निरुपयोगी ठरत आहे, याकडेही महापौरांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
सभागृहात गैरशिस्तीचे वर्तन करणाऱ्या सदस्याला सभागृहाबाहेर काढण्यासाठी जशी विधानसभेत वा लोकसभेत मार्शलची तरतूद करण्यात आली आहे, तशी तरतूद या नियमात करावी व संबंधित नियमात दुरुस्ती करावी आणि मार्शलकरवी अशा सदस्यांना बाहेर काढण्यासाठी अध्यक्षस्थानी असलेल्या प्राधिकाऱ्याला अधिकार द्यावेत, असेही महापौरांनी पत्रात म्हटले आहे. गोंधळ घालणाऱ्या एखाद्या पालिका सदस्याला सभेतून निघून जाण्याविषयी पंधरा दिवसांच्या आत दुसऱ्यांदा आदेश देण्यात आला असेल तर सभापती अशा सदस्याला पंधरा दिवसांसाठी निलंबित करू शकतील, अशी तरतूद नियमात आहे. या तरतुदीत सुधारणा करून गोंधळ घालणाऱ्य़ा सदस्याला पहिल्या वेळीही निलंबित करण्याचे अधिकार सभापतींना द्यावेत तसेच निलंबनाचा कालावधी पंधरा दिवसांऐवजी दोन महिन्यांचा असावा अशी तरतूद नियमात करावी, अशी मागणी महापौरांनी या पत्रातून केली आहे.
गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना तातडीने त्याच सभेत निलंबित करण्याचे आणि निलंबन दोन महिन्यांसाठी करण्याचा नियम केला तर महापालिकेच्या सभेत थोडय़ाफार प्रमाणात शिस्त निर्माण होईल, असेही महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.