पुणे : पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथीदारांच्या विरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. जाधवच्या साथीदारांनी नारायणगाव भागातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितली होती.
या प्रकरणी संतोष सुनील जाधव (रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे), जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात (दोघे रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे), जयेश रतिलाल बहिरट, जिशान इलाहीबक्श मुंढे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे), गणेश तारु, वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे (रा. जळकेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), रोहित विठ्ठल तिकटारे (रा. सरेवाडी, ता. खेड, जि. पुणे), सचिन बबन तिकटारे (रा. नायफड. ता. खेड, जि. पुणे) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.




नारायणगावमधील एका व्यावसायिकाला संतोष जाधव टोळीतील साथीदारांनी खंडणी मागितली होती. याबाबत व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपी नहार, थोरात, बहिरट, मुंढे, तिकटारे, तारु यांच्यासह अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे तपास करत आहेत.
जाधव याने वैमनस्यातून गेल्या वर्षी मंचर परिसरात ओंकार उर्फ बाणखेले याचा खून केला होता. या प्रकरणात त्याच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर जाधव मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पसार झाला होता. त्यानंतर पंजाबमधील गुंड लॅारेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. बिष्णोई टोळीने सिद्धु मुसेवाला यांची हत्या घडवून आणली होती.