पुणे : ‘झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसतानादेखील घरे रिकामी करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरमधील रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा,’ अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी रविवारी केली.

भीमनगर वाचविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार, मेधा पाटकर यांनी भीमनगरला भेट देऊन भीमनगरवासीयांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या. न्यायासाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाटकर यांनी पाठिंबा व्यक्त केला. या वेळी देविदास ओहाळ यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

भीमनगरच्या पुनर्वसनासाठी रहिवाशांना काही आश्वासने देण्यात आली आहेत. त्याच जागेवर चांगली घरे देण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे वस्तीतील ७० टक्के कुटुंबांची संमती मिळण्यापूर्वी ५० कुटुंबांना वारजे येथे पाठवण्यात आले. त्यांपैकी पंधरा कुटुंबे भीमनगरमध्ये परत आली. या कुटुंबांना ज्या ठिकाणी पाठविण्यात आले, ती इमारत विकासकाने नव्हे, तर महापालिकेने बांधलेली असल्यामुळे उर्वरित ३५ कुटुंबांना जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली. एक प्रकारे ही भीमनगरवासीयांची फसवणूकच आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.