Pimpri Ganesh Visarjan 2025 पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहे. आरोग्य विभागामार्फत शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जन घाटांवर तैनात करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय पथकात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, मदतनीस, रुग्णवाहिका चालक व सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे. या पथकांना मुबलक औषधसाठा, आवश्यक ते सर्व वैद्यकीय साहित्य, तसेच सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य समन्वयक म्हणून सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडीतील जाधव घाट, काळेवाडी स्मशान घाट, पिंपरीतील सुभाषनगर घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, केजुदेवी बंधारा घाट, सांगवी घाट आणि पिंपळे गुरव येथील घाटावर वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी निर्माल्यसंकलन कुंड बसवण्यात आले आहे. या कुंडात जमा झालेले निर्माल्य प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापरले जाणार असून, त्याचबरोबर त्यावर प्रक्रिया करून सुगंधी द्रव्य तयार करण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विसर्जनावेळी हार, फुले, पाने आणि पूजेसाठी वापरलेले साहित्य नदी-नाल्यात किंवा पाण्यात न टाकता या कुंडात टाकावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

भाविकांनी निर्माल्य कुंडांत टाकावे. नद्या, तलाव स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. जमा झालेले निर्माल्य सेंद्रिय खत आणि सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी वापरल्याने पुनर्वापर संस्कृतीला चालना मिळणार आहे. शहरात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.- सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. औषधसाठा व आवश्यक उपकरणांची व्यवस्था करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. तत्काळ उपचार व रुग्णवाहिका सेवेमुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास वैद्यकीय विभाग सज्ज आहे.डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका